विकास शहा
शिराळा : शिराळा आणि बेंदूर या सणाचे महत्त्वाचे नाते आहे. ग्रामीण भागात बैलपोळ्याचा सण अर्थात महाराष्ट्रीयन बेंदूर सणाची सर्वांनाच आतुरता आहे. आरळा, सोनवडे, रिळे, कांदे, मांगले आदीसह शिराळा शहरातील कुंभारवाड्यात मातीचे बैल तयार करण्याची लगभग सुरु आहे.
बेंदरा दिवशी मातंग समाजातील कुटुंबाकडून आंब्याच्या पानाचे तोरण तयार करुन ते घराला बांधण्याची व प्रत्येक शेतात तोरण टाकून पुरणपोळ्याचा नैवेद्य दाखविण्याची परपंरा आजही ग्रामीण भागात टिकन आहे.
तोरण बांधल्यानंतर त्या बदल्यात पोळ्याचा नैवेद्य तसेच बेरे म्हणून धान्य व दक्षणा देण्याची प्रथा आहे. त्यामुळे गावोगावी मातीच्या बैलाबरोबरच तोरण तयार करण्याचे कामेही सुरु आहेत. गेली दहा पंधरा दिवसापासून या कामाला गती आली आहे.
अलिकडच्या काही वर्षात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बैलजोड्या बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहेत. तरीही ग्रामीण भागात अजूनही मातीच्या बैलाचीच पूजा केली जाते. बेंदूर सणाच्या एक दोन दिवस आधी गावातील कुंभार चालत आलेल्या परंपरेनुसार ठरवून घेतलेल्या कुटुंबांना पूजन करण्यासाठी मातीचे बैल देतात.
त्या बदल्यात बेरे म्हणून धान्य किंवा पैसे घेत असतात आजही ही प्रथा ग्रामीण भागात टिकन आहे. प्रत्येक गावातील कुंभारवाड्यात, गल्लीत आता महिला लहान मुलेही बैल तयार करण्याच्या कामात हातभार लावत आहेत.
नागपंचमीचा खरा सण हा बेंदुरापासून सुरू होत होता. न्यायालयात नागपंचमी अडकल्याने जिवंत नाग पकडण्यास बंदी आहे. या अगोदर बेंदुरापासून अंबामाता मंदिरात नारळ फोडून नाग पकडण्यास सरुवात केली जात होती.
अजूनही ग्रामीण भागात मातीच्या बैलाची पूजा करण्याची प्रथा टिकून आहे. मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. १९ जुलै रोजी बेंदूर सण असल्याने तालुक्यात सर्वच कुंभार समाजातील लोक मातीचे बैल मोठ्या प्रमाणात तयार करतात. चालूवर्षी दर स्थिर असून प्रती जोडी ३० ते ५० रुपये असा दर आहे. पावसाळ्यात पहिल्यांदा येणाऱ्या बेंदूर व लगेचच येणाऱ्या नागपंचमी सणाला मातीच्या नागाची मूर्ती तयार करायला सुरुवात केली जाते. सलग येणाऱ्या दोन सणामुळे कुंभार समाजातील लोकांना आपल्या उदरनिर्वाहासाठी मोठा हातभार लागतो. - सुधाकर कुंभार, शिराळा