Join us

Bendur - Pola Festival: सर्जा-राजा'च्या उत्सव बेंदूर कसा साजरा केला जातो जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 10:33 AM

शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बेंदूर Bendur हा सण साजरा केला जातो.

बेंदूर आणि पोळा हा सण साजरा करण्याची पद्धत बहुतांशपणे सारखीच आहे. मात्र, बेंदूर हा सण आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो. तर, पोळा किंवा बैल पोळा हा सण श्रावण अमावास्येला साजरा केला जातो. शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.

या दिवशी सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातले जाते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घातली जाते. याशिवाय घरात मातीचे दोन बैल प्रतीक म्हणून तयार केले जातात. त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो.

बैलांच्या वशींडापासूनचा पुढील भाग आणि मानेच्या वरचा भाग म्हणजे खांदा. बेंदूर सणाच्या दिवशी बैलांची खांदेमळणी केली जाते. खांदेमळणी ही सुद्धा विशेष असते. यावेळी बैलांचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात. म्हणजेच बैलांचे खांदे गरम पाण्याने शेकले जातात.

त्यानंतर बैलांच्या खांद्यांना हळद लावली जाते. बेंदूर सणाच्या दिवशी बैलांना कोणत्याही कामाला जुंपले जात नाही. दिवसभर त्यांना विश्रांती दिली जाते. शेतकरी बांधव या दिवशी बैलांची सेवा करतात.

बैल आणि अन्य जनावरांना छान हिरवा चारा दिला जातो. दुपारनंतर बैलाला सजवले जाते. त्यांच्या शिंगांना छान रंग दिला जातो. अंगावर झूल घालतात. बेगड्या चिटकवल्या जातात. डोक्याला बाशिंग आणि गळ्यात घुंगरांची माळ घातली जाते.

यादिवशी नवीन वेसण, म्होरकी, कंडा बैलांना घातला जातो. बैलांच्या अंगावर विविध रंगांचे ठसे उमटवले जातात. त्यानंतर बैलांची पूजा करून त्यांची मिरवणूक निघते. ढोल-ताशांच्या गजरामध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते.

बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा बेंदूर हा सण शुक्रवारी (दि. १९) साजरा होत आहे. या सणाची घरोघरी जय्यत तयारी करण्यात आली असून, बेंदराच्या पूर्वसंध्येला ग्रामीण बाजारपेठा माती तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार करण्यात आलेल्या बैलजोड्या, झूल, गोंडे, कवड्यांच्या माळानी पुरती सजून जातात.

ज्यांच्या घरी बैलजोडी नाही असे शेतकरी, कष्टकरी, नोकरदार बाजारपेठेतून मातीच्या बैलजोड्या विकत घेतात. मातीच्या बैलजोडी आता आकर्षक पद्धतीने केल्या जात आहेत. त्यांचीही पूजा मनोभावे केली जाते.

इतर दिवशी या बैलजोडी दिवाणखान्यात शोभेच्या वस्तू म्हणून ठेवल्या जात आहेत. तीस रुपयांपासून आठशे रुपयांपर्यंत दर असलेल्या बैलजोड्या सध्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत. रंग, माती तसेच सजावट साहित्य महाग झाले असल्याने बैलजोडीच्या किमतीत वाढ झाली आहे.

टॅग्स :शेतकरीशेतीमहाराष्ट्रआषाढी एकादशी