महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात नुकताच बिगरमोसमी पाऊस पडून गेला आहे. पडलेल्या या पावसामुळे कोरडवाहू क्षेत्रातील जमिनीत बऱ्यापैकी ओलावा निर्माण झाला आहे. हा ओलावा कोरडवाहू रब्बी पिकांच्या दाणे भरण्याच्या अवस्थेपर्यंत टिकवून ठेवला गेला तर त्यांचे अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी तो फायदेशीर ठरणार आहे.
रब्बी हंगाम हा हिवाळ्यात येत असल्याने जास्तीत जास्त काळ वातावरण थंड असते. त्यामुळे पिकाच्या माध्यमातून वातावरण थंड ठेवण्यासाठी जास्त पाण्याची गरज नसते. म्हणजेच या हंगामात पिकाची पाण्याची गरज खरीप व उन्हाळी हंगामाच्या तुलनेत कमी असते. त्याचप्रमाणे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या बाष्पीभवनाचे प्रमाणही कमी असते. कित्येक वेळा हरभऱ्यासारखे पीक सकाळी पडणाऱ्या दवांमुळे बऱ्यापैकी उत्पादन देऊन जाते.
रब्बी हंगामात ज्वारी पिकास एकूण तीन कोळपण्या कराव्यात. पीक लागवडीनंतर तीन आठवड्याने केलेल्या पहिल्या कोळपणीमुळे जमिनीत वाढणारे तण नियंत्रित केले जाते, पाचव्या आठवड्यानंतर साधारणपणे जमिनीतील ओल कमी होऊ लागते व जमिनीला भेगा पडू लागतात. अशा परिस्थितीत दुसरी कोळपणी केल्यास या भेगा बुजण्यास मदत होते. तिसरी व शेवटची कोळपणी रब्बी ज्वारी पिकात दातेरी कोळप्याने पीक लागवडीनंतर आठ आठवड्यांनी करावी ज्याचा फायदा पुढे ज्वारीच्या कणसात दाणे भरण्याच्या कालावधीपर्यंत पिकास होतो.
कोळपणीप्रमाणे रब्बी पिकांमध्ये आच्छादनाचा वापर जमिनीच्या पृष्ठभागावरून होणारे बाष्पीभवन थांबवणे तसेच तणांचा बंदोबस्त करणे किंवा त्यांची वाढ होऊ न देणे याकरिता फायदेशीर दिसून आला आहे. शेतातच असलेले पदार्थ आच्छादनासाठी वापरता येतात. यामध्ये वाळलेले गवत, तूर काड्या, धसकटे, गव्हाचे काड किंवा उसाचे पाचट यांचा समावेश होतो. आच्छादन प्रती हेक्टरी ५ टन या प्रमाणात वापरावे. मात्र ते पीक उगवून आल्यानंतर जेवढ्या लवकर टाकता येईल तेवढ्या लवकर व जास्तीत जास्त पीक सहा आठवड्याचे होईपर्यंत टाकावे. आच्छादनाच्या वापराने सुमारे २५ ते ३० मि.मी. ओलावा उडून जाण्यापासून थांबवला जातो. याचाच अर्थ तेवढाच ओलावा पिकास उपलब्ध होतो.
डॉ. कल्याण देवाळणकर