पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट ही महाराष्ट्रातील ऊस या पिकावर संशोधन करणारी महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेकडून वसंतउर्जा हे फवारणीसाठीचे जैविक औषध बनवण्यात आले असून त्याचे अनेक फायदे ऊस शेतीसाठी होताना दिसत आहेत. तर वसंत उर्जाच्या वापरामुळे उसाचे जवळपास ३० ते ३५ टक्क्यापर्यंत उत्पादन वाढते असंही वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे डॉ. सुनील दळवी यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, उसाचे भरघोस पीक येण्यासाठी अनेक संस्था आणि खत कंपन्यांकडून वेगवेगळे रासायनिक आणि जैविक खते, संप्रेरके तयार करण्यात येतात. पण वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट आणि भाभा अनुसंशोधन केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जैविक खतांचा उसाला चांगला फायदा होण्यासाठी वसंतउर्जा ही निविष्ठा तयार करण्यात आली असून याचे चांगले फायदे शेतकऱ्यांना होताना दिसत आहेत.
काय आहे वसंतउर्जा? काय आहेत फायदे?वसंतउर्जा हे एक जैवसंजीवक असून ते नॅनोकणांच्या स्वरूपात पिकाला दिले जाते. ही निविष्ठा बहुउपयोगी असून पिकावर येणाऱ्या जैविक आणि अजैविक ताणासाठी ही निविष्ठा उपयोगी येते. त्याचबरोबर जिवाणू खताबरोबर, द्रवरूप खताबरोबर, पेस्टीसाईड खताबरोबर, तणनाशकासोबत या निविष्ठेचा वापर करता येतो. ज्या निविष्ठेबरोबर वसंतउर्जेचा वापर केला जातो त्या निविष्ठेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
हे जैवसंजीवक वापरल्यामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होताना दिसते. यामुळे पानांची लांबी, रूंदी, ताण सहन करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे रासायनिक निविष्ठांवरील खर्च कमी करून जैविक निविष्ठांचा वापर करून शाश्वत पीक उत्पादनासाठी वसंतउर्जेचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.