दिलीप कुंभारनरवाड : मिरज तालुक्यात सध्या पानवेलींच्या लागणीला वेग आला आहे. यासाठी 'कपुरी' जातीच्या पानवेलीच्या वाणास शेतकरी प्राधान्य देत आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून पानवेलीची लागण जून ते जुलैदरम्यान केली जाते. यापूर्वी ही लागवड श्रावण महिन्यात होत होती. मात्र, हवामानातील बदलामुळे आता यात शेतकऱ्यांनी बदल केला आहे.
पानमळा लागवडीसाठी काळी कसदार, पण निचऱ्याची जमीन लागले. खडकाळ जमिनीतही पानमळा येतो. मात्र, यासाठी कृत्रिम ताकद लावावी लागते. अधिक परिश्रम घ्यावे लागतात. अलीकडे पानमळ्यांचे आयुर्मान बदलत्या हवामानामुळे ३ ते ४ वर्षे झाले आहे. यापूर्वी हेच पानमळे ९ ते १० वर्षे तग धरत होते.
पानमळा लागवडीसाठी कपुरी, मगई, बनारस आदी पानांच्या जाती आहेत. मात्र, महाराष्ट्रातील मिरज तालुक्यातून व कर्नाटकातील चिक्कोडी तालुक्यातून कपूरी जातीच्या पानवेलीची निवड केली जाते.
लागवडीसाठी पानवेलीच्या शेंड्याकडील किमान ७ ते ८ कांडीचे कलम यासाठी बी म्हणून वापरले जाते. कलमाच्या प्रत्येक कांडीला हलक (लहान मुळ्या) असल्याने हे हलक्या जमिनीत गेल्यावर मूळ धरते.
पानवेली लागणीसाठी जमिनीत चर खोदन किमान तीन पानवेलीच्या कांड्या जमिनीत गाडून चार शेंड्याकडील कांड्या वर सोडल्या जातात. पुढे हीच पानवेल शेवग्याचा आधार देऊन वाढविली जाते. या पानवेलींच्या कलमांची किंमत ९ ते १० रुपयास एक आहे. पानवेलीची लागण करण्यासाठी एकरी ७ ते ८ हजार बी (कलमे) लागतात.
यासाठी किमान ८० हजार रुपये खर्च येतो. याशिवाय कामगारांचा खर्च २० ते २५ हजार रुपये येतो. पानमळा लागवडीसाठी कुशल कामगारच लागतात. पानवेली लागणीपासून ३ ते ४ महिन्यांनी उत्पन्न सुरू होते. यासाठी शेणखताची तजवीज करावी लागते. तरच पानवेली जोमाने वाढते.
रसायनांचा वापर केल्यास पानमळे जास्त वर्षे टिकत नाहीत. पहिल्या वर्षी पानमळ्याचे पैसे जेमतेम होतात. दुसऱ्या वर्षी पानमळ्यासाठी घातलेला खर्च निघून लाखभर नफा होतो. पानवेलीचा खुडा सुरू झाल्यानंतर २१ दिवसांनी फेर येतो.
पानमळा उतरणीनंतर दोन महिने नवीन पाने फुटण्यास विलंब लागतो. पानांची विक्री मुंबई, पुणे, रत्नागिरी, सांगोला, पंढरपूर, लांजा, फोंडा, गुजरात (राजकोट), पनवेल, खेड आदी ठिकाणच्या पान बाजारात होते. यासाठी एजंटांकडून पाने पाठविली जातात.
पानमळ्याचे पीक किफायतशीर असले तरी कुशल कामगारांचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने भविष्यात या पिकाकडे शेतकरी वळतीलच, असे वाटत नाही. - मधुकर जाधव, पान उत्पादक शेतकरी
अधिक वाचा: Halad Lagvad: हळद लागवडीसाठी ह्या आहेत महत्वाच्या टिप्स.. वाचा सविस्तर