देशातील अग्रणी मसाल्याचे ब्रँड्स असलेल्या दोन कंपन्यांच्या काही मसाले उत्पादनावर सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये बंदी आणल्याची बातमी प्रसिद्ध झाली. त्या मसाल्यात इथिलीन ऑक्साइड या कर्करोगास कारणीभूत होणाऱ्या घटकाची मात्रा सापडल्यामुळे ही कारवाई केली गेली, असेही त्यात नमूद आहे.
यापूर्वी युरोप समूहानेदेखील भारतातून निर्यात झालेल्या ४०० अन्नपदार्थात भेसळ असण्याची शक्यता आणि त्यामध्ये देखील कर्करोग आणि अन्य व्याधीस कारणीभूत असणारे घटक सापडल्याने आक्षेप घेतल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
त्याचबरोबर सडलेली पाने, लाकडाचा भुसा वगैरेंची भेसळ करून तयार केलेली धने पावडर, हळद, मसाले असा पंधरा टन माल दिल्ली येथे दोन कारखान्यांवर धाड टाकून अलीकडेच पोलिसांनी जप्त केला. या सर्व बाबतीत आणि विशेषतः दोन मसाल्यांच्या कंपन्यांबाबत भारतीयअन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत.
संबंधित बातम्यांनंतर प्रशासनाने कारवाईचे संकेत दिले आणि मग पुढील घटना उघड होईपर्यंत सर्वकाही आलबेल आहे, असे वातावरण सुरू राहते. जागतिक पातळीवर भारत ज्या बाबींसाठी प्रसिद्ध आहे, त्यात भारतीय मसाल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांची निर्यात युरोपियन देशांना हजारो वर्षांपासून होत होती.
आता तर 'इंडियन करी' म्हणून भारतीय मसाल्यावर आधारित अन्नपदार्थ जागतिक दर्जाची डिश म्हणून नावाजली जात आहे. अर्थात ज्या देशाचे मसाले खासियत आहेत आणि जर त्यामध्ये कर्करोगास निमंत्रण देणारे घटक सापडले असतील, तर त्यामुळे भारतातून निर्यात होणाऱ्या अन्नपदार्थाकडे जागतिक पातळीवर संशयाने बघितले जाईल.
त्याचा दुष्परिणाम निर्यातीवर आणि काही प्रमाणात भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो हे देखील नाकारून चालणार नाही. ही बाब गंभीर आहे, पण त्यापेक्षा जास्त गंभीर म्हणजे या देशात १४४ कोटी जनतेकडून असे भेसळयुक्त मसाले आणि अन्नपदार्थ खाल्ले जातात.
ज्यामध्ये कर्करोग व अन्य आजारास कारणीभूत ठरणारे घटक असतील आणि त्याकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष होत असेल तर या देशात मानवी जीवाला काही किंमत आहे किंवा नाही, असा प्रश्न निर्माण होतो.
आता, नागरिकांनी त्यांच्या लोकप्रतिनिधींना जागृत करून जे अधिकारी या भयानक प्रकारास जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाईसाठी सामाजिक दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा अनेक व्याधींना सामोरे जावे लागेल.
अधिक वाचा: Spices Export एथिलिन ऑक्साइडचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे मसाल्यांच्या निर्यातीवर बंदी