शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, कापूस आणि इतर शेतीमालाला बाजार समितीत किंवा खासगी व्यापाऱ्यांकडून अनेकदा हमीभावापेक्षा कमी भाव दिला जात असल्यामुळे शेतकरी हैराण झाले असून दसरा दिवळीच्या तोंडावर अवस्था बिकट झाली आहे. काही बाजार समितीत हमीभावापेक्षा जास्त दर मिळतो तर काही ठिकाणी उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी निराशा होते. पण अनेकदा सोशल मीडियावर बाजार समितीतील सौदापट्टी व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या सौदापट्टी आणि इतर अमिषांपासून शेतकऱ्यांनी सावधानता बाळगली पाहिजे.
शेतकऱ्यांना विक्रमी दर मिळाल्याच्या बाजार समितीतील सौदापट्टीचे फोटो अनेकदा व्हायरल झाल्याचं आपण पाहिलं असेल. यानंतर पुढच्या दिवशी सदर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होते. आपल्या मालाला चांगला दर मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. पण शेतकऱ्यांना त्यानुसार भाव मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होऊ शकते. म्हणून शेतकऱ्यांनी सोशल मीडियातील व्हायरल सौदापट्टीपासून सावध राहिले पाहिजे.
शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दर कोणताच व्यापारी किंवा बाजार समितीकडून दिला जात नाही. पण मालाची क्वालिटी, त्यातील माती, कचरा, आकार, रंग, डाग, उतारा या बाबी तपासून शेतकऱ्यांना दर दिला जातो. जर शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्यासाठी आणले तर सोयाबीनच्या दाण्यामध्ये असलेली आर्द्रता, दाण्याचा आकार, त्यातील कचरा, खराब दाण्यांची टक्केवारी आणि एकंदर मालाची आवक पाहून दर कमीजास्त होत असतात. जर आपल्या मालात कोणतीच चूक आढळली नाही तर शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर देता येत नाही.
बाजार समितीत येणारा माल कधीकधी ए-१ क्वालिटीचा असेल आणि आवक कमी झाली असेल तर हमीभावापेक्षा जास्तही दर मिळू शकतो. अशावेळी विक्रमी दर मिळाला तर सौदापट्टी सोशल मीडियावर व्हायरल केली जाते. त्यामुळे शेतकरी सदर बाजार समितीत गर्दी करतात. पण अशावेळी शेतकऱ्यांची निराशा होऊ शकते. शेतकऱ्यांनी काय घ्यावी काळजी?
सोशल मीडियावर आलेली सौदापट्टी कधीकधी खोटी असू शकते किंवा जुनी असू शकते. त्यामुळे व्हायरल मेसेजवर लगेच विश्वास ठेवायचा नाही. सौदापट्टीत दिलेल्या दरानुसार आपल्या मालाला दर मिळेल याची खात्री नसते. त्यामुळे सौदापट्टी खरी असली तरी बाजार समितीत झालेली एकूण आवक, मालाची क्वालिटी, हमीभाव, इतर बाजारांतील आणि सदर बाजार समितीतील दरांतील फरक या गोष्टी पडताळून पुढील निर्णय घेणे आवश्यक आहे.