खरीप हंगाम महिन्यावर आला आहे. तसेच या निमित्ताने बनावट बीटी बियाणे विक्री करणारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे बियाणे खरेदी करताना निष्काळजी केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे.
गडचिरोली जिल्ह्यात तेलंगणातून मोठ्या प्रमाणात बनावट बियाणे दरवर्षी येते. अहेरी, एटापल्ली, चामोर्शी येथे कापूस उत्पादन घेतले जाते. बियाणे खरेदी करताना बॅच क्रमांक पाहून पक्के बिल न घेतल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एप्रिल महिन्यातच अहेरी येथे कृषी विभागाने छापा टाकून १८ लाख रुपयांचे बनावट बियाणे पकडले होते.
त्यामुळे यावर्षी एप्रिल महिन्यापासूनच बनावट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी करताना बियाण्याची गुणवत्ता व कंपनीबाबतची विश्वासार्हता या बाबी तपासणे गरजेचे आहे.
.. तर तक्रार करा
• दरम्यान, कोणी बनावट बियाणे विक्री करत असेल तर तत्काळ कृषी विभागाला माहिती द्यावी. संबंधिताचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
• शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना गुणवत्तेबाबत तडजोड करु नये व फसवणूक झाल्यास विनाविलंब तक्रार करावी, असे आवाहन केले आहे.
हेही वाचा - निंबोळी अर्काच्या वापरामुळे वाचतो २५ टक्क्याहून अधिक कीटकनाशकांचा खर्च