Join us

सावधान! बोगस खते, बियाणे विकाल तर तुरुंगात जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 12:09 PM

खरीप हंगामात खते, बियाणे उपलब्ध करून देतानाच शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी राज्य शासनाकडून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

सांगली : खरीप हंगामात खते, बियाणे उपलब्ध करून देतानाच शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी राज्य शासनाकडून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. रासायनिक खते, कीटकनाशके, बियाणांमध्ये फसवणूक झाल्यास संबंधित कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.

त्यासाठी तालुकास्तरावर १० व जिल्हास्तरावर एक अशी ११ भरारी पथके नियुक्त करून लक्ष ठेवले जाणार आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाची ६३३ गावे असून दोन लाख ५५ हजार ९८४ हेक्टर क्षेत्र आहे.

उन्हाळी पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतीसाठी अडचणी येत आहेत तरीही शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व जमिनीची नांगरटी करून शेत तयार करण्याच्या कामाला वेग दिला आहे. शेतकरी उन्हाळी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

पाऊस पडल्यानंतर खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. १५ जूननंतर खरीप पेरण्यांना मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. त्यापूर्वी शेतकऱ्यांना खते, बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत.

तर परवानाही होणार निलंबित• खरीप हंगामात जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांनी बोगस बियाणे, खताची विक्री केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.• बियाणे, खताची बोगस विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करत परवानाही निलंबित केला जाऊ शकतो.

जिल्हास्तरावर एक स्वतंत्र पथकतालुकास्तरावर १० भरारी पथकांसह जिल्हास्तरावरही स्वतंत्र एक भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

तक्रार निवारण कक्ष कार्यान्वितशासनाच्या सूचनेनुसार जिल्हास्तरावर एक गुणनियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ७०५८२१७९७७ या क्रमांकाच्या मोबाईल नंबरवर बियाणे, खते, कीटकनाशके आदींच्या गुणवत्तेसाठी तक्रार करता येणार आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांची खात्री करूनच बियाणांची खरेदी करणे अपेक्षित ठरणार आहे.

शेतकऱ्यांनी खते, बियाणे, कीटकनाशके मान्यताप्राप्त कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावीत. खरेदी केलेल्या पावत्या जपून ठेवाव्यात. खते असोत वा बियाणे त्यांच्या पॅकिंगबाबतची माहिती वाचून घ्यावी. काही आक्षेपार्ह आढळल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार करावी. फसवणूक टाळण्यासाठी ११ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. - विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

अधिक वाचा: Ploughing जमीन का नांगरावी? काय आहेत फायदे

टॅग्स :शेतीशेतकरीखरीपसरकारतुरुंगखतेराज्य सरकार