येणाऱ्या १ नोव्हेंबरपासून उसाचा गाळप हंगाम सुरू होणार असून अनेक कारखान्यांचे मोळी पूजन आणि बॉयलर अग्निप्रदिपन सोहळे संपन्न झाले आहेत. यंदा उसाचे क्षेत्र कमी असल्यामुळे उसाचे गाळप करण्यासाठी कारखान्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. तर वजनकाट्यामध्ये होणाऱ्या फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्याच्या सूचना साखर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
अनेकदा शेतकऱ्यांचा उस कारखान्यांवर गेल्यावर वजनामध्ये तफावत आढळत असते. उसाच्या वजनात काटामारी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. पण शेतकऱ्यांकडे अधिकृत पुरावे नसल्यामुळे त्यांना कारखान्यांविरोधात आवाज उठवता येत नाही. अशावेळी वजनकाटे तपासणीबाबत शेतकरी संघटनांकडून सतत मागणी होते. ही काटामारी रोखण्यासाठी जिल्हा किंला तालुका स्तरावर भरारी पथके नेण्यात येणार असून त्यामध्ये महसूल, पोलीस, वैद्यमापन शास्त्र विभाग, प्रादेशिक सहसंचालक (साखर) आणि शेतकरी प्रतिनिधींची नियुक्ती केली जाणार आहे.
त्याचबरोबर भरारी पथक तालुका स्तरावर असेल तर संबंधित विभागाचे अधिकारी भरारी पथकाचे सदस्य राहतील आणि जिल्हा स्तरावरील भरारी पथक असेल तर जिल्हा स्तरावरील अधिकारी या पथकाचे सदस्य असणार आहेत. पथकातील सदस्यांची नावे आणि संपर्क क्रमांक शेतकऱ्यांना आणि साखर कारखान्यांना उपलब्ध करून देण्यात येण्यासाठीच्या सूचना केल्या आहेत.
दरम्यान, स्थापन केलेल्या भरारी पथकांकडून कारखान्यांवर अचानक भेटी देऊन वजनकाट्यांची तपासणी करून शेतकऱ्यांना वजनाची पावती योग्य प्रकारे देण्यात येते किंवा नाही याची खात्री केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून उसाच्या वजनासंदर्भात येणाऱ्या तक्रारीवर आळा बसेल. तर एखाद्या कारखान्याच्या वजनकाट्यामध्ये गैरप्रकार आढळल्यास त्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
ज्या काट्यामध्ये गैरप्रकार आढळला आहे त्या वजनकाट्याचे वैधमापन अधिकाऱ्यांकडून कॅलिब्रेशन करून सील केले जाणार आहे. यावेळी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना सोबत ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आयुक्तांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या होणारे संभाव्य नुकसान टाळता येणार असून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
वाहनांना रिफ्लेक्टर पट्ट्या लावण्याच्याही कारखान्यांना सूचना
उस वाहतूक करणाऱ्या वाहनांना पाठीमागे पुढे आणि दोन्ही बाजूने लाल, पिवळ्या आणि पांढऱ्या रिफ्लेक्टर पट्ट्या लावणे बंधनकारक आहे. या पट्ट्या लावल्या नाही तर रात्री समोरचे वाहन दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. म्हणून साखर आयुक्तालयाकडून या पट्ट्या लावण्याचे आदेश साखर कारखान्यांना दिले आहेत.