Join us

BharatNet Scheme : ग्रामपंचायतींमध्ये आता सुपरफास्ट इंटरनेट; तुमच्या गावात आले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 3:43 PM

'भारत नेट' प्रकल्पांतर्गत देशातील अडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायतींपर्यंत ऑप्टिकल फायबर नेटवर्क पोहोचवून इंटरनेट कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. (BharatNet Scheme)

BharatNet Scheme :

छत्रपती संभाजीनगर : 'भारत नेट' प्रकल्पांतर्गत देशातील अडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायतींपर्यंत ऑप्टिकल फायबर नेटवर्क पोहोचवून ग्रामपंचायती, तसेच गावातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, अंगणवाड्या व सरकारी कार्यालये इंटरनेट कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाची घोषणा सुरुवातीला २०११ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळामध्ये करण्यात आली. त्यानंतर २०१७मध्ये या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा मोदी सरकारने केली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सद्यःस्थितीत चार तालुक्यांतील ३६० ग्रामपंचायतींपर्यंत भूमिगत ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे पोहोचलेले आहे. मात्र, सध्या जलजीवन मिशन, स्मार्ट सिटी आणि सिमेंट रस्त्यांची सर्वत्र कामे सुरू असल्यामुळे ठिकठिकाणी भूमिगत ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे खंडित झालेले आहे.

त्यामुळे सध्या तरी या प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायतींना इंटरनेटची पूर्णपणे सुविधा सुरू झालेली नाही. जेव्हा ग्रामपंचायतींना विनाव्यत्यय इंटरनेटची सुविधा मिळेल, त्यानंतरच गावांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे, शाळा, अंगणवाडी, रेशन दुकान व अन्य सरकारी कार्यालयांना इंटरनेटची सुविधा सुरू होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 'भारत नेट'द्वारे सुरुवातीला किमान १० एमबीपीएसपर्यंत आणि पुढे १०० एमबीपीएस बँडविड्थ उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस असून, जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांना ऑनलाइन सेवांचा लाभ घेता येईल. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारेल. ग्रामीण भागात राहणारे विद्यार्थी ऑनलाइन वर्गाचा लाभ घेऊ शकतात.

जिल्ह्यात ७८० ग्रामपंचायतींना मिळणार इंटरनेट

जिल्ह्यातील ७८० ग्रामपंचायतींना भारत नेट' प्रकल्पाद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

आरोग्य केंद्र, शाळा, पोलिस ठाण्यांनाही इंटरनेट मिळणार

या प्रकल्पाद्वारे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती इंटरनेट कनेक्टिव्हिटीने जोडल्यास त्या गावांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, पोलिस ठाण्यांनाही इंटरनेटची सेवा मिळणार आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रइंटरनेटग्राम पंचायतशाळापोलीस ठाणे