शंकर पोळ
कोपर्डे हवेली : कऱ्हाड तालुक्यात सध्या भातकाढणी वेगाने सुरू असून, काही ठिकाणी मजुरांच्या साह्याने तर काही ठिकाणी मशीनद्वारे भातकाढणी सुरू आहे.
यावर्षी झालेल्या दमदार पावसाने इतर पिकांचे नुकसान झाले असले तरी यंदा भाताला उतारा समाधानकारक आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. इतर विभागाच्या तुलनेत कोपर्डे हवेली परिसरात भाताचे क्षेत्र जास्त आहे.
कऱ्हाड तालुक्यातून गेलेल्या कृष्णा, कोयना नद्या व आरफळ डावा कालव्यामुळे काही वर्षांपासून भात शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यापूर्वी कमी-अधिक प्रमाणात पडणाऱ्या पावसाने भाताला समाधानकारक उतारा मिळत नव्हता.
मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण वाढल्याने भातशेतीमध्ये वाढ झाली. उत्पादनही चांगले निघत आहे. पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने भात पीक चांगले आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकाला चांगला उतारा मिळेल, अशी आशा शेतकरी वर्गाला आहे.
दिवसेंदिवस मजुरांची संख्या कमी होत असल्याने शेतकऱ्यांना नेहमीच मजुरांचा तुटवडा जाणवत असतो. त्यामुळे काही शेतकरी पैरा पद्धतीने एकमेकांना भात काढण्यासाठी मदत करत असतात, तर काही शेतकरी भात काढणी मशीनच्या साह्याने करताना दिसत आहेत.
सुमारे साडेपाच ते सहा महिन्यांचे पीक असलेल्या भाताची काढणी पूर्ण झाल्यावर रानाची मशागत करून काही शेतकरी उसाची सुरुवातीची लागण करत आहेत, तर काही शेतकरी गव्हाच्या पिकासाठी रान तयार करताना दिसत आहेत.
एकरी ३५ ते ४० पोती उत्पादन
साधारणपणे मे मध्ये पेरणी केलेल्या भाताला सरासरी ३५ ते ४० पोती उत्पादन झाले आहे, तर रोपांची लागण केलेल्या भाताला एकरी सरासरी ४५ ते ५० पोती भाताचे उत्पादन यंदा झाले आहे, पेरणीपेक्षा रोपांची लागण केलेल्या भात पिकाच्या उत्पादनात वाढ झाले असल्याचे बहुतांश शेतकऱ्यांनी सांगितले.
कोपर्डे हवेलीत भाताचे कोठार
तांदळाला बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्याने कोपर्डे हवेली परिसरात भाताच्या क्षेत्रात प्रतिवर्षी वाढ होताना दिसत आहे. भात पिकाला जमीन पूरक असल्याने उत्पादन चांगले मिळते. शिवाय इंद्रायणी जातीचा तांदूळ सुवासिक असल्याने तांदळाला चांगली मागणी आहे.
यंदाच्या हंगामात पावसाचे चांगले प्रमाण असल्याने भाताचे पीक जोमदार आल्याने उत्पादन चांगले मिळत आहे. - स्वप्नील चव्हाण, भात उत्पादक शेतकरी, कोपर्डे हवेली