Join us

Bhat Utpadan: आतबट्ट्याची भातशेती कोकणात यंदाही होणार उत्पादनात घट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 10:37 AM

आधीच्या काळात पैशांपेक्षा तुमच्या घरात किती गुरं आहेत, किती खंडीची शेती आहे, त्यावरून तुमची श्रीमंती ठरायची. लग्न वगैरे ठरवताना त्याकडेच पाहिलं जायचं, पैशांना फार महत्त्व नव्हतं.

आधीच्या काळात पैशांपेक्षा तुमच्या घरात किती गुरं आहेत, किती खंडीची शेती आहे, त्यावरून तुमची श्रीमंती ठरायची. लग्न वगैरे ठरवताना त्याकडेच पाहिलं जायचं, पैशांना फार महत्त्व नव्हतं.

त्यावेळी भात हे गरिबांचं पीक असं म्हटलं जात नव्हतं. मोठं, संयुक्त कुटुंब आणि त्यांचा शेती हा उत्तम व्यवसाय ठरवला जात होता. पण चित्र बदललंय. कोकणही त्याला अपवाद नाही.

कोकणात भातशेती मोठ्या प्रमाणात होते आणि त्यातही रायगडसारख्या भागाला 'भाताचं कोठार' अशी उपमा मिळते, हे भूषणावह म्हणायचं की गरिबीचं लक्षण, याचा विचार आता करावा लागेल.

येथे आकाश चार महिने असं काही कोसळतं, की भाताशिवाय या प्रदेशात काहीही पिकू शकत नाही. सर्वात स्वस्त धान्य आणि खूप हातांना काम देणारं भाताचं पीक म्हणजे गरीबांचं पीक, असं म्हटलं जातं.

पण रायगडला 'कोठारा'ची बिरुदावली आता नकोशी झालीय. तो मान आता हळूहळू सिंधुदुर्गाच्या दिशेने सरकू लागलाय, सर्वांत जास्त भात उत्पादन करणारा जिल्हा म्हणून.

आता हवामान बदल आणि वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे सिंधुदुर्ग, रायगड आणि कोकण प्रदेश गरिबांची ही शेती कितपत पेलून धरणार, हा प्रश्नच आहे.. मुळात भात पीक म्हणजे चार महिन्यांचं पीक समजलं जातं.

कृषी विद्यापीठ भाताचं वाण काढतात तेही ११०, १२०, १४० दिवस अशा कालावधीचा उल्लेख करूनच, सामान्य लोकांना वाटेल, की तांदूळ चार महिन्यात तयार होतो. पण कोणत्याही शेतकऱ्याला विचारलंत, तर तो सांगेल आम्ही तर वर्षभर मरत असतो. तेव्हा कुठे हातात येतं हे धान्य.

पारंपरिक पद्धतीत कवळतोडणीपासून कापणीपर्यंतचा काळ धरला तर ते खरंच वर्षाचं नियोजन आहे. कवळतोडणी, भातलावणी असो वा बेणणी, कापणी, भात झोडणी, प्रत्येक कामाची ठराविक 'वेळ' साधावीच लागते.

साहजिकच ही कामे वेळेत आटोपण्यासाठी जास्तीत जास्त हात लागतात. आधी ते मनुष्यबळ घरातलंच असायचं. प्रत्येकावर वेगवेगळ्या कामाची जबाबदारी असायची. पण आता मजूर बोलावले जातात. त्यामुळे भातशेती प्रचंड खर्चिक झाली आहे.

त्या तुलनेत तांदळाला भाव खूपच कमी आहे. त्यामुळे भातशेतीचा खर्च सध्या यंत्रांद्वारे मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, पण गेली काही वर्षे हवामान बदलाच्या समस्येने त्याचाही बट्याबोळ होतो आहे. यंदा परतीच्या पावसाने भाताचे ५ ते १० टक्के नुकसान केलेले आहे. अजून अनेक ठिकाणी पंचनामे सुरू आहेत.

डुक्कर आणि इतर वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचीही त्यात भर पडली आहे. साहजिकच न परवडणाऱ्या भातशेतीला शेतकरी कंटाळला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

या पार्श्वभूमीवर कोकण कृषी विद्यापीठ सुधारित वाण, ड्रम सीडर तंत्रज्ञान, तर कृषी विभाग पूरक व्यवसायाची जोड असलेली एकात्मिक शेती आणि छोट्या वाफ्यावरील 'सगुणा'सारखे भात लागवड तंत्रज्ञान आदीचा प्रकर्षाने प्रसार करीत आहे. पण शेतकरी म्हणतोय, बस्स झालं.

हाताला काम देऊनही पावसामुळे पोटाला काहीच मिळणार नसेल, तर ही शेतीच नको. त्याऐवजी शेतजमिनी विकून टाकू आणि कारखान्यांत काम करू, रायगडमधलं हे वास्तव उद्या सिंधुदुर्गात दिसेल. परवा कदाचित दुसऱ्या 'कोठारा'त. आणि भविष्यात तांदूळ आयात झाला, तरी त्यात काही वाटणार नाही.

राजगोपाल मयेकरवरिष्ठ उपसंपादक

टॅग्स :भातपीकशेतकरीशेतीकोकणरत्नागिरीसिंधुदुर्ग