सहदेव खोतपुनवत : शिराळा तालुक्यात नुकत्याच संपलेल्या खरीप हंगामात विविध जातींच्या भात वाणांना चांगला उतारा मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गुंठ्याला सरासरी एक पोत्याचा उतारा पडल्याचे दिसून येत आहे. चांगल्या पाऊसकाळामुळे यंदा भात उत्पन्न समाधानकारक झाले. शिराळा तालुक्यात खरीप हंगामातील प्रमुख पीक हे भात आहे.
तालुक्याच्या सर्व भागात भात पिकाचे चांगले उत्पादन घेतले जाते. जुन्या गावठी बियाण्यांबरोबरच अनेक जातींच्या संकरित बियाण्यांचा वापर शेतकरी करतात.
यावर्षी शिराळी मोठे या स्थानिक बियाण्याबरोबरच कोमल, वाय. एस. आर., सोनम, रत्नागिरी १, रत्नागिरी २४ तुळशी, मासाड आदी जातींच्या भात बियाण्यांपासून शेतकऱ्यांकडून पीक घेतले जाते.
अधिक वाचा: Maka lagwad : ज्वारी पेरणीचे क्षेत्र घटले यंदा मक्याचे क्षेत्र दुपटीने वाढले
भात पिकाचा कालावधी तीन ते साडेतीन महिन्यांचा असतो. जून-जुलैपासून सप्टेंबरपर्यंत पाऊस चांगला लाभल्यास भाताचे चांगले उत्पन्न मिळते.
चौदा गुंठ्यांत वीस पोती भातपुनवत येथील प्रगतशील शेतकरी महादेव बजरंग शेळके यांनी वाडा कोलम या भात वाणाचे चौदा गुंठ्यांत वीस पोती (एक खंडी) असे उच्चांकी उत्पन्न घेतले. या भागातील इतर अनेक शेतकऱ्यांनाही समाधानकारक लाभ झाला आहे.
यावर्षी भात पिकाला समाधानकारक उत्पन्न मिळाले आहे. शेतकऱ्यांना गुंठ्याला एक ते दीड पोत्याच्या सरासरीने उतारा मिळाला आहे. चांगल्या पावसामुळे पिकाची हानी झालेली नाही. शिवाय वैरणही शेतकऱ्यांच्या पदरात पडली आहे. - प्रकाश कोपार्डे, शेतकरी, खवरेवाडी