सोलापूर : सोलापुरातील कावळे, घार अन् बगळ्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळं झाल्याचं भोपाळ येथील हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसिज लॅबोरेटरीने स्पष्ट केले आहे.
दोन्ही सिद्धेश्वर तलाव आणि धर्मवीर छत्रपती संभाजीराजे तलाव परिसरात सतर्कता बाळगण्यात येत असून, तिथे नागरिकांना येण्यास प्रतिबंध केला आहे.
दरम्यान, दिवसभरात पशुवैद्यकीय विभाग, महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून मृत पक्षी एकत्र केले.
भविष्यात बर्ड फ्ल्यूचा प्रसार इतरत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत.
त्यानुसार छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर व किल्ला बाग परिसर येथे सर्वेक्षण करण्यात येत आहे. दहा किलोमीटर त्रिजेतील क्षेत्र हा सतर्क भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे.
बाधित क्षेत्राच्या ठिकाणी नागरिकांच्या हालचाली व इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आले आहे. शहरातील दोन्ही बाधित परिसर सोडियम हायपोक्लोराइड किंवा पोटॅशियम परमॅग्नेट यांचा वापर करून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिसरातील पक्ष्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
मृत पक्ष्यांची अशी लावणार विल्हेवाट
पशुसंवर्धन विभागाने आजारी पक्ष्यांचे नमुने व मृत पक्षी तत्काळ तपासणीसाठी पाठवावेत. त्याचा अहवाल प्राप्त करून घ्यावा, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मृत पक्ष्यांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी किमान तीन फूट खोल खड्डा करून त्यामध्ये चुना पावडर व पक्षी पुरण्याची प्रक्रिया पूर्वपरवानगीने करण्यात यावी. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस बंदोबस्त पुरवण्यास आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पोल्ट्री शॉप सर्वेक्षण; चालकांची तपासणी
दोन्ही परिसर महानगरपालिका प्रशासन यांच्यामार्फत निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा भाग लोकांच्या रहदारीसाठी प्रतिबंधित केला आहे. या भागात तशा पद्धतीचे बॅनर लावण्यात आले आहेत. आरोग्य विभागामार्फत पोल्ट्री शॉपचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. शॉपचालक आजारी आहे का? तसेच त्यांच्याकडे आढळणाऱ्या कोंबड्या व कोंबडीजन्य उत्पादने यांची माहिती जमा करण्यात येत आहे.
दहा पथके घेणार पाळीव पक्ष्यांचे नमुने
दोन्ही बाधित क्षेत्रामध्ये पशुसंवर्धन विभागाची किमान दहा पथके तयार करण्यात आली आहेत. एक किलोमीटर परिसरातील पाळीव व इतर पक्ष्यांचे सर्वेक्षण केले जात आहे तसेच दहा किलोमीटरचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर केलेला आहे. या भागातील नमुने रँडम पद्धतीने काढून पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांना आवश्यकतेनुसार महापालिका आरोग्य विभाग, पोलिस विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, वनविभाग, जलसंपदा विभाग व परिवहन विभाग यांना आवश्यक म्हणून मनुष्यबळ व यंत्रसामग्री पुरवठा करण्याबाबत सांगण्यात आले आहे.
अधिक वाचा: कोंबड्यांना शेडमध्ये उष्णतेचा त्रास होतोय हे कसे ओळखाल? वाचा सविस्तर