Join us

पिक विम्याबद्दल मोठी बातमी.. कांदा लावला ७५ हजार हेक्टरवर, विमा काढला २.६३ लाख हेक्टरचा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 9:52 AM

Kanda Pik Vima राज्यात यंदा खरिपात घेतल्या जाणाऱ्या कांद्याचे क्षेत्र कृषी विभागाच्या अंदाजानुसार ७५ हजार हेक्टर आहे. मात्र, पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत २ लाख ६३ हजार हेक्टर कांदा पिकाच्या क्षेत्राचा विमा उतरविला आहे.

पुणे : राज्यात यंदा खरिपात घेतल्या जाणाऱ्या कांद्याचे क्षेत्र कृषी विभागाच्या अंदाजानुसार ७५ हजार हेक्टर आहे. मात्र, पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत २ लाख ६३ हजार हेक्टर कांदा पिकाच्या क्षेत्राचा विमा उतरविला आहे.

एकूण क्षेत्राच्या हे प्रमाण साडेतीनशे टक्क्यांनी जास्त असल्याने राज्यातील आठ जिल्ह्यांमधील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तसेच जिल्हाधिकाऱ्यांना कांदा पिकाखालील क्षेत्राची गावनिहाय तपासणी करण्याचे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत.

पीक विमा योजनेत विमा उतरविलेल्या पिकाच्या क्षेत्राची तपासणी होत नसल्याने, तसेच कांदा पिकाला सर्वाधिक नुकसानभरपाई मिळत असल्याने असे प्रकार होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात या योजनेत सहभागी होता येते. शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याची रक्कम राज्य सरकार भरते, त्यासोबत विमा उतरविताना शेतकरी स्वतःच पिकाची नोंद करतो व विमा उतरविलेल्या पिकाची कोणतीही पडताळणी होत नाही.

नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास विमा उतरवलेल्या क्षेत्रानुसार शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळते. याचा गैरफायदा घेणारे अनेक जण असून, गेल्या वर्षी एकाच शेतकऱ्याने ४९ हजार हेक्टरवरील क्षेत्राचा पीक विमा उतरविल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर कृषी विभागाने यासंदर्भात कारवाई करून संबंधित शेतकऱ्याला योजनेतून काढून टाकले होते.

कांदा पिकाचा विमा काढण्याचे प्रमाण जास्त का?अन्य पिकांच्या तुलनेत कांदा पिकाची विमा संरक्षित रक्कम सर्वाधिक, ४६ हजार ते ८१ हजार ४२२ रुपये आहे. त्यामुळे ५० टक्के नुकसानभरपाई मिळाली, तरी ही रक्कम अन्य खरीप पिकांच्या तुलनेत जास्त आहे, तसेच कितीही रकमेचे विमा संरक्षण घेतले, तरी राज्य सरकार १०० टक्के रक्कम भरते. त्यामुळे शेतकरी शेतात कांदा पीक नसतानाही विमा उतरवत असल्याचे कृषी विभागाचे निरीक्षण आहे.

तपासणीचे निर्देशसंबंधित विमा कंपनीकडून गावनिहाय प्रत्यक्ष क्षेत्र आणि विमा क्षेत्र याचा तपशील गोळा करून त्याची शासकीय यंत्रणेमार्फत तपासणी करावी. बनावट अर्ज करणाऱ्यांविरुद्ध जिल्हास्तरीय समितीने कारवाई करावी.

जिल्हाअंदाजित क्षेत्रविमा क्षेत्रटक्के
नाशिक१६४४६५४६२८३८२
धुळे५३०८६३११६२८
नगर२३४८४३६२४३१५४
पुणे६७४८३८२१५५६६
सोलापूर३५५९५८५६४३२४१
सातारा१७९६१२४३२६९२
संभाजीनगर२३३७११४४४४९०
बीड४६५९२३९८३५१५
एकूण७५३१२२६३१३६३४९

कृषी विभागाचा नजरअंदाजआठ जिल्ह्यांमध्ये कांद्याचे क्षेत्र ७५ हजार ३१२ हेक्टरप्रत्यक्षातील पीक विमा - आठ जिल्ह्यांमध्ये २ लाख ६३ हजार १३६ हेक्टरवरील कांदा पिकाचा विमा आठ जिल्हे कुठले ? - नाशिक, धुळे, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर व बीड

टॅग्स :कांदापीक विमापीकशेतकरीशेतीखरीपराज्य सरकारसरकारजिल्हाधिकारीमहाराष्ट्र