मुंबई: परीक्षेची त्यांनी खूप तयारी केली, परीक्षाही झाली, पण एका घटनेने परीक्षेचा पेपर लीक झाल्याची शंका निर्माण होऊन परीक्षाच रद्द करण्यात आली आणि पुन्हा परीक्षा घेण्यात आली.
ज्यांची निवड झाली अशा ६०१ अधिकाऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार असून, त्यांना १३ फेब्रुवारीला नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत.
ही कथा आहे, मृद व जलसंधारण विभागाची. राज्य सरकारी सेवेत ७५ हजार पदे भरण्याचा संकल्प महायुती सरकारने सोडलेला होता.
त्याचाच एक भाग म्हणून या विभागातील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) यांची ६७० पदे भरण्यासाठीची प्रक्रिया राबविण्याचे ठरले.
त्यानुसार पदभरतीची प्रक्रिया राबविण्याचे काम टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (टीसीएस) देण्यात आले होते. २८ जिल्ह्यांमधील ६६ केंद्रांवर २० फेब्रुवारी आणि २१ फेब्रुवारी २०२४ रोजी लेखी परीक्षा घेतली.
५२,६९० उमेदवारांनी अर्ज केले होते. अमरावती येथील एका परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीच्या प्रवेशपत्राच्या झेरॉक्स प्रतिवर उत्तरेसदृश माहिती आढळून आली. त्यावर नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला होता. त्यात काहीही निष्पन्न झाले नाही, मात्र परीक्षा रद्द करण्यात आली.
मंत्रालयात बैठक आणि परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश● १९ जून २०२४ रोजी मंत्रालयात बैठक झाली आणि परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी दिले. त्यानुसार मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या सात शहरांतील टीसीएस-आयओएन या ११ अधिकृत केंद्रावर १४, १५ आणि १६ जुलै रोजी फेरपरीक्षा झाली.● टीसीएसकडून २५ सप्टेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. निवड झालेल्या अधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समारंभपूर्वक देण्यात येणार आहेत.● ६७० जणांची निवड करण्यासाठी ही परीक्षा घेण्यात आली. प्रत्यक्षात ६६६ जणांची निवड केली गेली. त्यातील ज्यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झालेली आहे अशा ६०१ जणांना नियुक्तीपत्रे दिली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अधिक वाचा: Farmer Id : शेतकऱ्यांना दिले जाणारे फार्मर आयडी कशासाठी? काय होणार त्याचा फायदा? वाचा सविस्तर