सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा साखर उद्योगात राज्यात नावलौकिक आहे. मागील हंगामात सोमेश्वर कारखान्याने गतवर्षीच्या उसाला राज्यात जादा दर दिला आहे.
आता सोमेश्वर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाने देशपातळीवरील पुरस्कारावर आपली मोहर उमटविली असून, देशातील सहकारी सहवीजनिर्मिती प्रकल्पामधून "बेस्ट को-जनरेशन प्लांट"चा पुरस्कार पटकाविला आहे. जानेवारीत पुरस्काराचे वितरण होईल.
या पुरस्कारासाठी दोन वर्गवारी केल्या असून, यामध्ये सहकारी व खासगी अशा वर्गवाऱ्या करण्यात आल्या असून, यामध्ये सहकारी वर्गवारीत को-जनरेशन प्रकल्पाला पहिला क्रमांक मिळाला आहे.
३६ मेगावॅट क्षमता असलेल्या प्रकल्पातून ८० केजी पेक्षा जास्त प्रेशर, तसेच मागील तीन वर्षाची वीजनिर्मिती आणि वीज विक्री सरासरी सर्वांत जास्त असल्याने सोमेश्वरने हा पुरस्कार मिळविल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.