पुणे : यंदा वर्षाच्या सुरूवातीलाच कृषी विभागातील आस्थापनेवरील कृषी सेवक या पदासाठी महाराष्ट्रभर भरती झाली होती. यासाठी अनेक तरूण तरूणींनी परिक्षा दिली होती. पण अद्याप या परिक्षेचा निकाल न लागल्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत. तसेच अनेक उमेदवारांकडून विचारणा होत असून यासंदर्भातील मोठी अपडेट कृषी विभागाकडून आली आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे.
दरम्यान, "आय.बी.पी.एस संस्थेमार्फत दि.१६ व १९ जानेवारी, २०२४ रोजी कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयातील विभागीय कृषी सहसंचालक (सर्व ) यांचे आस्थापनेवरील कृषी सेवक पदांसाठी भरतीप्रक्रिया झाली होती. त्याबाबत अद्यापही निकाल न लागल्यामुळे उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत आहे. तरी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात येते की, याबाबत कृषी आयुक्तालय स्तरावरुन निकालाबाबत आय.बी.पी.एस संस्थेकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. यास्तव निकाल प्राप्त होताच संबंधित विभागस्तरावरुन प्रसिद्ध करण्यात येईल." असं कृषी आयुक्तालयाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
तर परिक्षेचा निकाल लवकर लागावा आणि पदावर रूजू व्हावे यासाठी उमेदवार आग्रही आहेत. तर अजूनही कृषी आयुक्तालयाकडून पाठपुरावाच सुरू असल्याने काही विद्यार्थी नाराज झाले आहेत.