Join us

Biofortified Crops : बायोफोर्टिफाईड पिके म्हणजे काय? त्याचा शेतकऱ्यांना कसा लाभ होतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 3:38 PM

Biofortified Crops India : सध्या बोयोफोर्टिफाईड पिकांचा मोठा बोलबाला केला जात आहे. कुपोषण आणि अन्नातील हरवलेल्या अन्नघटकांवर ही पिके फायद्याची ठरत असल्याचं बोललं जातंय.

Biofortified Crops for Farmer : शेतीमध्ये जसंजसं तंत्रज्ञान वाढत जात आहे त्याचबरोबर शेती उत्पादनात वाढ होण्यासाठीही प्रयत्न होत आहेत. उत्पादनात लक्षणीय वाढ होण्यासाठी संकरित वाणांची निर्मिती झाली. त्याममुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ तर झालीच पण अन्नामध्ये असलेले अन्नद्रव्यांची कमतरता भासू लागली. त्यावेळी बायोफोर्टिफाईड पिकांची संकल्पना समोर आली. 

आपण खात असलेल्या अन्नामधून पोट भरतंय पण त्यातील अन्नद्रव्ये, व्हिटामीन्स, सूक्ष्म अन्नद्रव्ये, मिनरल्स हरवली आहेत. संकरित वाणांमुळे ही अन्नद्रव्ये पिकांमधून कमी झाली. यामुळे नागरी अन्नपुरवठ्याच्या माध्यमातून गरिबांपर्यंत पोहोचणाऱ्या अन्नामध्ये ही कमतरता जाणवू लागली. या कमतरतेला सुप्त भूक असं नाव दिलं गेलं. यामुळेच बालकांमध्ये कुपोषण वाढू लागले. ही भूक भरून काढण्यासाठी बायोफोर्टिफाईड पिकांचा शोध घेण्यास सुरूवात झाली.

ही संकल्पना साधारण ९० च्या दशकात मांडली गेली. १९९९ साली या संकल्पनेची मांडणी एका बैठकीत केली गेली पण प्रत्यक्षात या संकल्पनेवर २००३ साली काम सुरू करण्यात आले. इफ्री संस्थेत काम करत असलेले प्रोफेसर हावडी यांनी ही संकल्पना मांडली आणि त्यावर काम करायला सुरूवात केली. 

बायोफोर्टिफाईड पिके म्हणजे काय?संकरित वाणांमध्ये कमी झालेले पोषणद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्ये वाढवणे आणि स्थानिक पिकांच्या वाणांपासून तेवढेच उत्पादन देणारे आणि पोषणद्रव्ये अधिक असलेल्या पिकांचे वाण म्हणजेच बायोफोर्टिफाईड पिके होय. या पिकांनाच मराठीत जैवसंपृक्त पिके असे म्हटले जाते. 

(Importance of Biofortified Crop)

काय आहे या पिकांचा फायदा?या पिकांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात कोणत्याही प्रकारची घट होत नाही. या पिकांच्या उत्पादनाला बाजारात दरही जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही पिके महत्त्वाची ठरतात. तर देशातील कुपोषण कमी करणे आणि आहारातील पोषणमूल्ये वाढण्यासाठी ही पिके महत्त्वाची आहेत. पोषमूल्ये कमी असल्यामुळे होणाऱ्या आजारांवर उपाय म्हणून या वाणांपासून तयार होणारे अन्न हे येणाऱ्या काळात आहारातील महत्त्वाचा भाग असणार आहे. 

सध्य आहारात जास्तीत जास्त उपयोग होत असलेल्या पिकांवर म्हणजे तांदूळ, गहू,बाजरी, डाळी आणि कडधान्यांपासून बायोफोर्टिफाईड वाणांची निर्मिती केली जात आहे. येणाऱ्या काळात अशा अनेक वाणांची निर्मिती केली जाणार असून गरिबांच्या आहारामध्ये सामावेश करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

माहिती संदर्भ - भूषणा करंदीकर (अन्न परिसंस्था संशोधक)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपीक