पुणे : शालेय पोषण आहारामध्ये जैवतंत्रज्ञान वर्धित पोषण धान्यांचा सामावेश करण्यासंदर्भात वारे वाहू लागले असून पुण्यातील गोखले इन्स्टिट्युट येथे जैवतंत्रज्ञान वर्धित पोषण धान्यांचा म्हणजेच बायोफोर्टिफाईड पिकांचा MDM आणि ICDS योजनांमध्ये सामावेश करण्यासाठी कार्यशाळा पार पडली. यावेळी, "मध्यान्ह आहार हा विद्यार्थ्यांची पोषणाची गरज पूर्ण करणारा,चविष्ट स्थानिक चवीला प्राधान्य देणारा इत्यादी गोष्टींचा समतोल राखणारा असावा" असे मत राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी व्यक्त केले आहे.
(Biofortified Crops of Millets)
दरम्यान, हार्वेस्टप्लस, अॅग्रोझी ऑर्गॅनिक्सच्या सहकार्याने 'बायोफोर्टिफाइड पिके: कुपोषणविरोधी लढाईसाठी एक क्रांतिकारी उपाय' या विषयावर गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. डॉ धनंजयराव गाडगीळ सेंटर फॉर सस्टेनेबल व्हिलेज डेव्हलपमेंट तर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळेतील बालकांचा पोषण आहार आणि आहारातील अन्नातील पोषण मुल्यांबाबत चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात बोलताना शिक्षण आयुक्त सुरज मांढरे म्हणाले, "मध्यान्ह आहार हा विद्यार्थ्यांची पोषणाची गरज पूर्ण करणारा,चविष्ट स्थानिक चवीला प्राधान्य देणारा इत्यादी गोष्टींचा समतोल राखणारा असावा. कोणत्याही भागांमध्ये जे पिकते किंवा बनते त्याच गोष्टींचा समावेश दैनंदिन जीवनात करावा कारण अशा गोष्टी त्या भागातील परिसंस्थेला धरूनच असतात."
"सरकारी धोरणांमध्ये अशा कार्यशाळांमधून मिळणाऱ्या आउटपुटचा वापर व्हावा असे वाटत असेल तर आयोजकांनी अतिशय थोडक्या पद्धतीने आणि सहज अवलंब करता येईल अशा पर्यायांचा वापर करून त्यांचा रिपोर्ट सरकारी कार्यालयांमध्ये किंवा संबंधित आस्थापनांमध्ये सादर करावा. त्यातूनच या परियोजनांचे अंमलबजावणी सहज शक्य असते." असं मत मांढरे यांनी व्यक्त केले.
या कार्यशाळेत मध्याह्न भोजन (MDM) आणि समेकित बाल विकास सेवा (ICDS) योजनेच्या रूपरेषेत बायोफोर्टिफाइड पिकांच्या पोषण परिणामांमध्ये सुधारणा करण्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे प्रात्यक्षिक दाखवले गेले आहे. सहभागी लोकांना बायोफोर्टिफाइड पिकांचा समावेश केल्यामुळे मिळणाऱ्या अत्यंत फायद्यांविषयी जाणून घेण्याची संधी मिळाली, ज्याचे उद्दिष्ट मुलांना आवश्यक पोषक तत्त्वे पुरवणे आहे. कार्यशाळेत नुट्री पाठशाळा मॉडेल अंतर्गत भागीदारांनी त्यांचे अनुभव सांगितले. ज्यामुळे या उपक्रमामुळे मुलांच्या आरोग्य आणि विकासात झालेल्या प्रत्यक्ष परिणामांचे आणि सकारात्मक बदलांचे उदाहरण पाहायला मिळाले.