Join us

Bird flu: 'बर्ड फ्ल्यू'मुळे धाराशिव जिल्ह्याची यंत्रणा 'हाय अलर्ट मोड'वर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:59 IST

Bird flu: ढोकी येथे द‌गावलेल्या कावळ्यांचा अहवाल 'बर्ड फ्ल्यू' (Bird flu) पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. परिसरातील दहा किमीचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

धाराशिव/ ढोकी : ढोकी येथे द‌गावलेल्या कावळ्यांचा अहवाल 'बर्ड फ्ल्यू' (Bird flu) पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. ढोकीपासून दहा किमीचा परिसर अलर्ट झोन (Alert Zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग आणि आरोग्य विभाग आता हाय अलर्ट मोड (high alert mode) वर काम करताना दिसत आहे.

आता खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील अंदाजे दहा ते बारा हजार कोंबड्यांचे (Poultry) सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ढोकी पोलिस ठाणे व सुभाष देशमुख यांच्या घराच्या परिसरात २१ फेब्रुवारी रोजी कावळे मरून पडल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पथक ढोकीत धडकले, दोन्ही ठिकाणांना भेट दिली असता, जवळपास ८ कावळे मृत्तावस्थेत आढळून आले. कावळ्यांना 'बर्ड फ्ल्यू'ची लागण झाली असावी, असा संशय बळावल्यानंतर दोन कावळे तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते.

मृत्यू अचानक झाल्याने त्यांची तपासणी करण्यासाठी हे दोन्ही पक्षी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठिवले. प्रयोगशाळेने २४ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाला अहवाल दिला आहे. त्यानुसार दोन्ही कावळ्यांचा मृत्यू 'बर्ड फ्ल्यू'ने (Bird flu) झाल्याचे समोर आले. यानंतर पशुसंवर्धन विभागासह जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अंमल सुरु करण्यात आला आहे.

'बर्ड फ्ल्यू'चा (Bird flu) जिल्ह्यात शिरकाव झाल्याने सर्वसामान्यांसह कुक्कुटपालक धास्तावले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता ढोकीपासून दहा किमी अंतरातील तब्बल १० हजारांपेक्षा अधिक कुक्कुट पक्ष्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सोबतच गावातील आजारी लोकही ट्रेस केले जात आहेत. त्यांच्या आजाराबाबत आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून माहिती घेण्यात येत आहे.

आजारी लोकांचा घेणार शोध

'बर्ड फ्ल्यू'च्या पार्श्वभूमीवर यंत्रणेकडून ढोकी गावात उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

घरगुती शेडही तपासणार

ढोकीसह परिसरात घरगुती कुक्कुटपालन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सोबतच शेडही आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून आता घरगुती तसेच शेडचीही तपासणी करण्यात येणार आहे.

तपासणीदरम्यान (सर्वेक्षण) आजारी अथवा मृत लहान-मोठ्या पक्षांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कावळे दगावण्याचे सत्र सुरू

ढोकीसह परिसरात कावळे दगावण्याचे सत्र सुरूच आहे. मात्र, चार-पाच दिवसांच्या तुलनेत हे प्रमाण कमी झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मागील दोन दिवसांत प्रत्येकी दोन-तीन दगावलेले कावळे आढळून आल्याचे यंत्रणेने 'लोकमत ऍग्रो'ला सांगितले.

'आरोग्य'कडून खबरदारी....

कावळ्यांच्या माध्यमातून ढोकी येथे बर्ड फ्ल्यूने शिरकाव केल्यानंतर आरोग्य यंत्रणेकडूनही खबरदारी घेण्यात येत आहे. डोकीसह परिसरातील आजारी लोकांना 'देस' करण्यात येत आहे. त्यांना कोणता आजार आहे?, किती दिवसांपासून आहे?, कोणकोणती लक्षणे आहेत?, कुठे उपचार घेतला?, आदी माहिती घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

०४ कावळे आढळले मृतावस्थेत...

ढोकी गावालगत संग्राम देशमुख, राजू समुद्रे या दोन शेतकऱ्यांच्या शेतात बुधवारी आणखी चार कावळे मृतावस्थेत आढळून आले.

खबरदारीचा उपाय म्हणून दहा किमी अंतरातील कोंबड्यांचेही सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मात्र, आजवर एकाही कुक्कुट पक्ष्यात हा आजार आढळून आलेला नाही. बहुदा हा अजार कावळ्यांपुरताच मर्यादित राहू शकतो. - यतीन पुजारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव.

हे ही वाचा सविस्तर : Bird flu: कावळ्यांद्वारे 'बर्ड फ्ल्यू' धडकला ! काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपोल्ट्री