प्रकाश महाले
राजूर: अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथे काळी मिरी लागवडीचा पथदर्शी प्रयोग यशस्वी झाला आहे. यातील दोन वेलीच्या झाडांना तब्बल दहा किलो ओली मिरी निघाली आहे.
कोकणातील काळ्या मिरीचे पीक तालुक्यातही घेता येऊ शकते अशा आगळ्या वेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून रामलाल हासे यांनी शेतकऱ्यांपुढे घालून दिला आहे.
तीन वर्षांपूर्वी म्हाळादेवी येथील सेवा निवृत्त शिक्षक रामलाल हासे यांनी आपल्या गावातील आंब्याच्या बागेत मोकळ्या जागेत मसाल्यातील राणी म्हणून ओळख असलेल्या काळ्या मिरीच्या आठ रोपांची लागवड केली होती.
यातील दोन रोपे गेली तर सहा रोपे शिल्लक राहिली. यातील सहा वेली चांगल्या पद्धतीने वाढली. मागील वर्षी या सहा वेलींचे एकूण पाच किलो उत्पन्न मिळाले होते
या वर्षी या सहा वेलींना काळी मिरी लगडली आहे यातील दोन वेलींची फळे तोडले असता ती दहा किलो याचाच अर्थ अकोले तालुक्यातही काळी मिरीचे उत्पन्न घेता येऊ शकते असा विश्वास रामलाल हासे यांनी व्यक्त केला.
तीन वर्षांपूर्वी आंब्याच्या बागेत असलेल्या मोकळ्या जागेत आपण आठ मिरीच्या रोपांची लागवड केली होती. यातील सहा रोपे वाचली. मागील वर्षी यात सर्व मिळून अवघे पाच किलो मिरीचे उत्पन्न निघाले होते.
मात्र यावर्षी दोनच वेलींना दहा किलो पर्यंत ओल्या फळांचे उत्पन्न मिळाले. इतर चार झाडांची तोडणी अद्याप बाकी आहे. या वेलवर्गीय झाडांना कोणतेही रासायनिक खत अथवा फवारणीसाठी औषधांचा वापर केला नाही.
यासाठी शुन्य उत्पादन खर्च आला आहे व सेंद्रिय, विषमुक्त उत्पादन घेतले आहे. काढलेली या ओल्या मिरीचे फळे आता आपण वाळवणार असून वाळल्यानंतर तिच्या दहा ते वीस ग्रॅमच्या पुड्या तयार करणार आहोत.
मिळालेल्या उत्पन्नाची विक्री न करता घरी येणाऱ्या मित्र परिवाराला व पाहुण्यांना यातील एकेक पुडी भेट म्हणून देणार आहे. मी केलेला प्रयोग यशस्वी झाला. आपल्या वातावरणात चांगले पिक येते.
तालुक्यातील शेतकऱ्यांनीही आपल्या शेत जमिनीच्या बांधावर, घरापुढे परस बागेत किंवा मोकळ्या जागेत मिरीची लागवड करावी व एका वेगळ्या उत्पन्नाचा स्रोत निर्माण करावा.
अधिक वाचा: गुळ व आधारित उत्पादनातून वाढविला शेतीचा गोडवा; खर्च वजा जाता पावणेतीन लाख रुपयांचा फायदा