Join us

पुण्याच्या कोळवण खोऱ्यात पिकवला जातोय थायलंड, मलेशियाचा 'निळा तांदूळ'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 3:44 PM

कोळवणचे खोरे हे इंद्रायणी या सुवासिक तांदळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध

सुगंधी इंद्रायणी तांदळासाठी प्रसिध्द असणाऱ्या पुण्याच्या कोळवण खाेऱ्यात आता थायलंड, मलेशिया येथे पिकणाऱ्या निळ्या तांदळाचे उत्पादन होत आहे. या तांदळात अनेक औषधी गुणधर्म असणाऱ्या  या तांदळाला बाजारात सर्वाधिक मागणी आहे.

कोळवणचे खोरे हे इंद्रायणी या सुवासिक तांदळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. थायलंड, मलेशिया येथे पिकणाऱ्या निळ्या तांदळाचे उत्पादन हे कोळवण खोऱ्यातील चिखलगाव येथे होत आहे. मुळशी तालुक्यात हा प्रयोग प्रथमच चिखलगावातील प्रगतशील शेतकरी लहू मारुती फाले यांनी यशस्वी केला आहे.

मधुमेह, हृदयरोगासह कॅन्सरला प्रतिरोधक

हा तांदूळ निळा गडद जांभळ्या रंगाचा असून या औषधी गुणधर्माच्या तांदळास मोठी मागणी होत आहे. या तांदळामध्ये लोह, झिंक, कॅल्शियम, फायबर तसेच अँटिऑक्सिटेन्ट मोठ्या प्रमाणात असून मधुमेह, हृदयरोग तसेच कॅन्सरला प्रतिरोधक आहे. साधारणत: एक एकरमधून सोळाशे किलो साळीचे उत्पादन मिळते व प्रति किलो २५० रुपये या दराने तांदूळ ग्राहक शेतात येऊन खरेदी करीत आहेत. कोणत्याही रासायनिक

खताचा वापर न करता पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने असे तांदळाचे उत्पादन होत आहे. या वाणाची उंची साधारणत: सात फुटांची असते. त्यामुळे पेंढाही जास्त मिळतो. कमी पावसात व हलकी किंवा मुरमाड जमिनीमध्ये याचे उत्पादन चांगले निघते. या वाणाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने कोणतेही रोग या पिकावर पडले नाहीत, पिकाचा कालावधीही १२० दिवसांचा आहे. हा तांदूळ पिकवण्यासाठी तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे, कृषी सहायक शेखर विरणकर यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे लहू फाले यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने या तांदळाचे उत्पादन घ्यावे. औषधी गुणधर्म असल्याने यास मोठी मागणी होत आहे. बाजारात या तांदळास साधारणतः प्रति किलोला ८०० ते १००० दर मिळत आहे. शासनाने यासाठी मार्गदर्शन केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते.- लहू फाले, शेतकरी

औषधी गुणधर्म असल्याने भविष्यात या तांदळाची मागणी वाढणार आहे. बाजारात दर चांगले मिळत असून जास्तीत जास्त क्षेत्रात लागवड होईल त्या दृष्टीने प्रयल राहील. कृषी प्रदर्शन, बचतगट, मॉलमधून विक्री होईल यासाठी प्रयल करू. - हनुमंत खाडे, तालुका कृषी अधिकारी, मुळशी

टॅग्स :भातपुणे