Join us

Body Detox : दिवाळीत तोंड गोड केलं असेल ना? तर आता शरीर स्वच्छ करून घ्या, नाहीतर आजारपण येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 1:06 PM

दिवाळीत (Diwali Food) मिठाई, चकली, मूठभर चिवडा आणि तोंडभर लाडू यावर यथेच्छ ताव मारला जातो. उष्मांकाने भरलेल्या अन्नपदार्थांमुळे शरीर आणि मन आळसावलेले असते. वर्षातून एकदा हा आनंद लुटणे योग्य असले, तरी आता शरीराला (Body Health) आवश्यक विश्रांती देण्याची वेळ आली आहे.

दिवाळीत मिठाई, चकली, मूठभर चिवडा आणि तोंडभर लाडू यावर यथेच्छ ताव मारला जातो. उष्मांकाने भरलेल्या अन्नपदार्थांमुळे शरीर आणि मन आळसावलेले असते. वर्षातून एकदा हा आनंद लुटणे योग्य असले, तरी आता शरीराला आवश्यक विश्रांती देण्याची वेळ आली आहे. शरीरात जमा झालेली अतिरिक्त साखर आणि चरबीपासून शरीर 'डिटॉक्स' करून घ्या, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.

'डिटॉक्स' म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ आणि अशुद्धता काढून टाकण्याची प्रक्रिया. शरीराला पुन्हा आरोग्याकडे परत नेण्यासाठी आणि ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी याची मदत होते. हे केवळ विशिष्ट अन्न खाणे अथवा शरीराची उपासमार करण्यापुरते मर्यादित नसल्याचे आहारतज्ज्ञ डॉ. स्वाती अवस्थी यांनी सांगितले. त्यांच्यानुसार, शरीर डिटॉक्स करण्यासाठी पाणी आणि जलपदार्थांची भूमिका महत्त्वाची ठरते.

त्यामुळे दररोज किमान ८ ग्लास पाणी प्या. दिवसाची सुरुवात शक्य असेल तर कोमट पाणी आणि लिंबूने करा. सोबतच नारळपाणी आणि ताकदेखील पिऊ शकता. ताजी फळे, भाज्या आणि औषधी वनस्पतींपासून बनवलेल्या निरोगी स्मुदीज हासुद्धा चांगला पर्याय ठरतो. चहा, कॉफीऐवजी ग्रीन टी घ्या. हे शरीरातील पाण्याची चरबी काढण्यास मदत करते.

पुरेशी झोप घ्या

रात्री चांगली झोप ही शरीर आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. ताजे, उत्साही आणि तणावमुक्त राहण्यासाठी किमान ७ ते ८ तास झोपण्याची सवय लावा.

कॅलरीज बर्न करा

● योग्य आहारासोबतच चालणे, ट्रेडमिलवरचा व्यायाम, योगासनांची निवड करा. काही मिनिटांसाठी योग आणि ध्यानाचा सराव करा. त्यामुळे निरोगी मन आणि शरीराचे योग्य प्रकारे संचालन करण्यास मदत मिळते.

तळलेले पदार्थ टाळा

● तळलेल्या पदार्थांना आता विश्रांती द्या. आहारात कच्ची फळे आणि भाज्यांचा समावेश करा. हिरव्या भाज्या, पालक, बीटरूट, काकडीतील पुरेसे अँटिऑक्सिडंट्स शरीराची चयापचय प्रक्रिया मजबूत करण्यास मदत करतात. आहारात लिंबू, टोमॅटो, संत्री, आवळासारख्या व्हिटॅमिन सीने समृद्ध पदार्थांचा समावेश करा. बाजारातील प्रक्रिया केलेले आणि पॅकेज केलेले खाद्यपदार्थ टाळा.

हेही वाचा : Food Processing : आरोग्यदायी अन् पौष्टिक 'कोदो मिलेट'ची चकली; मिलेट प्रक्रिया उद्योगातील आधुनिक संधी

टॅग्स :हेल्थ टिप्सदिवाळी 2024भाज्याआरोग्यआहार योजनाअन्न