रासायनिक खतविक्रीमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी आठ कृषी केंद्रांचे खत परवाने वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा परवाना अधिकारी राहुल सातपुते यांनी बुधवारी केली.
यापूर्वी मुख्य वितरकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे, तर पाच कृषी केंद्र चालकांना ताकीद देण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात रासायनिक खतांऐवजी ५० लाखांची माती विकण्याचा भंडाफोड कृषी विभागाने केला होता.
संबंधित रामा फर्टिकेम खत कंपनीकडे आयएफएमएस प्रणालीवर आयडी क्रमांक नसतानासुद्धा मंदार ऍग्रो सव्हिसेस या मुख्य वितरकाद्वारा सहा तालुक्यांतील १२ किरकोळ विक्रेत्यांना खतांची विक्री करण्यात आली.
त्यामुळे एसएओ राहुल सातपुते यांनी या विक्रेत्याचा खत परवाना यापूर्वी कायमस्वरूपी रद्द केला आहे. या खताची पॉस मशीनशिवाय विक्री करणाऱ्या १२ कृषी केंद्रांना नोटीस बजावण्यात आली होती.
सुनावणीदरम्यान रामा फर्टिकेम या कंपनीचे खत 'ओ' फार्म परवान्यात समाविष्ट नाही व या खताची संबंधित कृषी केंद्रातून पॉस मशीनशिवाय विक्री झाल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने खताची रक्कम पाच केंद्र चालकांनी परत केली. त्यामुळे या केंद्रांना ताकीद देण्यात आली, तर अन्य आठ केंद्रांचे परवाने वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण ?
पुणे येथील रामा फर्टिकेम या खत कंपनीद्वारा जिल्ह्यात किमान ५० लाख रुपये किमतीचे डीएपी व एनपीके ऐवजी चक्क माती विक्री करण्यात आली असल्याचा प्रकार समोर आला आहे.
यांनी केली कारवाई
कृषी उपसंचालक उदय आगरकर व जिल्हा कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांनी घेतलेले खतांचे नमुने अप्रमाणित आल्यानंतर या कंपनीविरोधात एफआयआर नोंदविण्यात आली आहे.
या केंद्रांचे परवाने निलंबित
तिवसा तालुक्यात नीलेश कृषी केंद्र (मारडा), भामकर कृषी केंद्र (शिवणगाव), गणेश कृषी केंद्र (तिवसा), सावरकर कृषी केंद्र (तिवसा), याशिवाय खंडेश्वर कृषी केंद्र (नांदगाव खं), शुभम कृषी केंद्र (मंगरूळ च.). अमोल कृषी केंद्र (रिद्धपूर) व राऊत कृषी केंद्र (चांदूर रेल्वे) या केंद्रांचा खत विक्री परवाना १२ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला.