बापू सोळुंके
छत्रपती संभाजीनगर : लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने १ रुपयांत पीक विमा योजना आणली. या योजनेतील बोगस विमा घोटाळा गतवर्षी उघडकीस आल्यानंतर फळबाग विम्यातील (Fruit Insurance) बनवेगिरी आता समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांतील १२ हजार ३१५ बोगस फळबागधारकांचे विमा अर्ज अपात्र ठरविले आहेत. यात सर्वाधिक अपात्र शेतकरी जालना जिल्ह्यातील आहेत. (Fruit Insurance)
एक रुपयात पीकविमा मिळत असल्याचे पाहून अनेक जिल्ह्यांत बोगस पीकविमा काढून आपले उखळ पांढरे करुन घेण्याचा प्रयत्न केला होता. शासनाने फळबाग विम्यासाठी एक रुपयांत विम्याची योजना लागू केलेली नाही. यामुळे फळबागेचा विमा (Fruit Insurance) काढण्यासाठी शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता कंपनीकडे भरावा लागतो.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १३ हजार २८६ शेतकऱ्यांनी तर जालना जिल्ह्यातील १८ हजार ९२२ फळबाग विम्याचे अर्ज कंपनीला मिळाले होते. बीड जिल्ह्यातील ३ हजार ४२३ शेतकऱ्यांचे विमा अर्ज होते. या अर्जाची विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संयुक्त पडताळणी केली. तेव्हा अनेक धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आले. (Fruit Insurance)
अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे अस्तित्वात नसलेल्या फळबागेचा विमा (Fruit Insurance) उतरविल्याचे दिसून आले. तर काहींनी त्यांच्या शेतातील फळबागेपेक्षा दुप्पट, तीनपट क्षेत्राचा विमा उतरविला.
जालना जिल्ह्यात सर्वाधिक बोगसगिरी
* फळबाग विमा योजनेत सर्वाधिक बोगसगिरी जालना जिल्ह्यात झाली आहे. जालना जिल्ह्यातील ७,९२५ शेतकऱ्यांचे फळबाग विमा अर्ज अपात्र ठरविण्यात आले.
* माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १३ हजार २८६ विमा अर्जापैकी ४ हजार ३३ अर्ज अपात्र ठरले आहेत.
* माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील ३५७ शेतकऱ्यांनी फळबाग विम्यात ही बनवेगिरी करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले.
तीन जिल्ह्यांमधील १२ हजारांवर फळबाग विमा अर्ज अपात्र ठरविण्यात आले. शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्राचा विमा उतरला होता. तर काही शेतकऱ्यांनी अस्तित्वात नसलेल्या फळबागांचा विमा काढला होता. अशा शेतकऱ्यांवर पुढील कारवाई शासनाच्या धोरणानुसार करण्यात येईल. - डॉ. तुकाराम मोटे, विभागीय कृषी सहसंचालक
हे ही वाचा सविस्तर : Tur Kharedi : शासकीय केंद्रांकडे तूर उत्पादकांनी 'या' कारणामुळे फिरवली पाठ