Join us

Bogus seeds, fertilizers : शेतकऱ्यांच्या माथी पुन्हा बोगस बियाणे अन् खते !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 3:44 PM

Bogus seeds, fertilizers : ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या घरी जाऊन खत अन् बियाणे विक्री केल्याचा प्रकार उघडीस आला आहे. 

Bogus seeds, fertilizers : ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या घरी जाऊन खत अन् बियाणे विक्री केल्याचा प्रकार उघडीस आला आहे.  खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हंगाम असतो; परंतु ऐन खरीप हंगामातच बोगस बियाणे आणि खतामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यंदाही असाच अनुभव जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आला. 

बोगस बियाणे प्रकरणात आठ तर खत प्रकरणात ४० तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. खताच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बियाणांच्या तक्रारीनुसार पंचनाम्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी, सुल्तानी संकटांचा सामना करीत आहेत. त्यातच खरीप हंगामात बोगस बियाणांच्या तक्रारी अधिक आल्याने आता शेतकऱ्यांचे काय करायचे, असा सवाल निर्माण होतोय. 

त्यात सोयाबीनच्या तक्रारींचा समावेश मोठा होता. कृषी विभागाने पंचनामे केले; परंतु शेतकऱ्यांना ग्राहक मंचात धाव घ्यावी लागली होती. 

चालू वर्षातही खरिपाचा १०० टक्क्यांवर पेरा झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे सोयाबीनसह कपाशीला अधिक महत्त्व दिले आहे. त्याशिवाय इतर पिकांचाही पेरा झाला आहे.

विशेषतः यंदा वेळेवर पाऊस झाल्यामुळे खरिपातील पिकांची वाढ चांगली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील आठ शेतकऱ्यांनी बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यात सोयाबीन, कोबी, कांदा, मिरची आदी पिकांचा समावेश आहे. प्राप्त तक्रारीनुसार कृषी विभागाकडून शेतीवर जाऊन पंचनामे केले जात आहेत. 

दुसरीकडे खताबाबतही ४० तक्रारी कृषी विभागाकडे आल्या होत्या. या तक्रारींची चौकशी सुरू केल्यानंतर संबंधित विक्रेत्याने शेतात नेऊन खत पुरला होता. तो खताचा लाखोंचा साठा जप्त करण्यात आला असून, त्या प्रकरणात भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जादा दराने कपाशीची विक्री

अंबड येथील एका कृषी सेवा केंद्र चालकाने जादा दराने कपाशीची विक्री केल्याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय एका कृषी विक्रेत्याने शासनाची परवानगी नसलेली औषधी विकल्याचे समोर आले होते. त्या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परवाना नसताना खत घरोघरीतीर्थपुरी व परिसरात एका कंपनीने शासनाचा परवाना नसतानाही घरोघरी जाऊन खताची विक्री करण्यासाठी बुकिंग सुरू केल्याचे समोर आले होते. त्या प्रकरणातही तीर्थपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२० बियाणांच्या विक्रीवर होती २१ दिवसांची बंदी

•कृषी विभागाने तपासणीदरम्यान संशयित २० बियाणांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्या बियाणांच्या विक्रीवर २१ दिवसांची बंदी घालण्यात आली होती.• प्रयोगशाळेतील अहवालानंतर काही बियाणांवरील बंदी हटविण्यात आली आहे. तर ४ खते व ६ कीटकनाशकांवरही काही काळ बंदी घालण्यात आली होती.

बियाणांच्या तक्रारीत पंचनामे सुरू

कृषी विभागाकडे प्राप्त तक्रारींनुसार चौकशी करण्यात आली आहे. काही प्रकरणात कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बियाणांच्या तक्रारीत पंचनामे करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.  - महादेव काटे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, जालना

टॅग्स :शेती क्षेत्रखतेशेतकरीशेती