Join us

बोगस बियाणे कायद्यासंदर्भात बियाणे कंपन्यांचे म्हणणे काय?

By मुक्ता सरदेशमुख | Published: July 20, 2023 6:33 PM

बोगस बियाणे आणि खतांसंदर्भात नव्याने येणाऱ्या कायद्याच्या धर्तीवर बियाणांच्या बोगसतेचे निकष काय? बियाणे कंपन्यांचे आणि शेतकऱ्यांची भूमिका काय? बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी अशा प्रश्नांना समजून घेऊया..

पेरण्यांच्या तोंडावर बोगस बियांणांचा सुळसुळाट, कृषी विभागाचे धाडसत्र, बोगस कंपन्यांचे निलंबन, परवाने अनधिकृत, अशा मथळ्यांच्या  बातम्या झळकणे तसे दरवर्षीचेच. ओघाने शेतकऱ्यांची लूट, बियाणे कंपन्यांचे धाबे दणाणले असेही विषय येणेही आता नवे राहिले नाहीत. बोगस बियाणे, खते यांची उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर अजामिनपात्र गुन्ह्याची तरतूद असणारा कायदा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. आता या सगळ्याकडे पाहायचे कसे? मुळात बोगस म्हणजे काय? बियाणं बोगस आहे की नाही हे ठरवणार कसे? याची स्पष्टता येणे आवश्यक आहे. 

बोगस बियाणांवर कारवाई करण्यासाठी आता राज्य सरकार नवा कायदा करणार आहे. बोगस बियाणांच्या सध्याच्या कायद्यात बदल करून तो अधिक कडक केला जाईल. बीटी कापूस बियाणे कायद्याच्या धर्तीवर इतर पिकांच्या बियाणांसाठीही आता कायदा करण्यात येणार आहे.  बोगस खतांच्या बाबतीतही दोषींवर कारवाई करण्यासाठी खताचा आवश्यक वस्तू कायद्यात समावेश करण्यात येणार आहे.  बोगस म्हणजे काय?

 बाजारात उपलब्ध असणाऱ्या अधिकृत बियाणे कंपन्यांच्या नावाशी मिळते जुळते किंवा त्याच छापाचे नाव वापरून त्याची विक्री केली जाते.  या नकली बियाणांच्या पाकिटांवर छपाईत फेरफार करून ही विक्री होत असते. शेतकऱ्याला नाव वाचता आले नाही किंवा खऱ्या खोट्यातला फरक कळला नाही की त्याची फसवणूक होते. 

"शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" या तुकारामांच्या अभंगातील ओळींचा दाखला  शासकीय पातळीवर द्यायचा ठरवला आणि त्यांना जर कोणी विचारले शुद्ध आणि बोगस म्हणजे काय हो  ? तर भंबेरी उडेल अशी परिस्थिती. कारण बोगस या शब्दाची व्याख्याच करण्यात आलेली नाही. परिणामी बोगस बियाणं ओळखायचं कसं याबाबतही संभ्रम. 

जर बियाणांच्या बोगसतेचे निकषच नसतील तर ते बोगस आहे की नाही हे कसे ठेवणार? की सगळ्या बियाणांना सर्रास बोगस ठरवून कारवाई करणार?  हा बियाणे कंपन्यांचा प्रश्न. बोगस बियाणांवर कायदा करायचा असेल तर शासनाने मुळात बोगस म्हणजे काय याची व्याख्या करण्यात यावी असा बियाणे कंपन्यांचा सूर आहे. 

"शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये आणि त्यासाठी कायदा असावा यात वावगे काहीच नाही. तो असणे चांगलेच आहे.  मात्र, कायदा करण्याआधी एकदा बियाणे कंपन्यांच्या समित्यांशी बोलून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. शास्त्रीय पद्धतीने बोगसतेच्या निकषांची चाचपणी व्हावी एवढेच आमचे म्हणणे आहे." शालीग्राम वानखेडे, एनएसएआय, छत्रपती संभाजीनगर  

कृषितज्ज्ञांच्या मते मान्सूनचा पाऊस ७५ ते १०० मि. मी. झाल्यानंतरच पेरणी करणे उचित ठरते. शेतकरी पहिल्या पावसावरच पेरणी उरकतात आणि पावसाचा खंड पडला की निकृष्ट बियाण्याची चर्चा सुरू होते. यात  यात  बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीमुळे होणाऱ्या नुकसानाची भर पडते. जर बोगस बियाणांचे उत्पादन आणि विक्रीला छाप बसावा यासाठी हा कायदा येत असेल तर चांगलेच आहे. कायद्यामुळे बियाणांच्या बोगसतेवर वचक बसेल, अशी शेतकऱ्यांची बाजू आहे. 

 भारतात बियाणे सदोष निघाले तर काय व्यवस्था आहे? 

देशातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय बियाणे कायदा १९९६ करण्यात आला आहे. १ ऑक्टोबर १९६९ पासून तो अमलातही आला आहे. या कायद्यानुसार देशातील विविध भागासाठी किंवा स्थानिक दृष्टय़ा महत्त्वाच्या जाती किंवा पिके प्रमाणित वाण (नोटीफाईट व्हरायटी) म्हणून जाहीर केले आहे.  या जातींच्या उत्पादन आणि विक्रीसाठी हा कायदा लागू आहे. बियाणे सदोष निघाल्यास शेतकऱ्यांना या कायद्यान्वये न्याय मागता येतो. मात्र त्यासाठी काही मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे असते.

बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी? 

महाराष्ट्र कृषी विभागाकडून बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याच्या सूचना जरी करण्यात येतात. यामध्ये बियाणे खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या काय तपासावे अशा अनेक बाबींचा समावेश असतो. यात, बियाणे खरेदी करताना खरेदीची पक्की पावती घ्यावी. त्यावर बियाणे खरेदी करणाऱ्याचे नाव, पिकाचे व जातीचे नाव, गट क्रमांक, उत्पादकाचे नाव व पत्ता, विक्रेत्याची सही इत्यादी नोंदी असाव्यात. कोणतेही बियाणे घेताना परवानाधारक कृषी केंद्रधारक विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे. बियाण्याची उगवणक्षमता, शुद्धता, चाचणीची तारीख इत्यादी काळजीपूर्वक वाचावे. प्रमाणित बियाण्याच्या टॅगवर अधिकाऱ्यांची सही असल्याची खात्री करून घ्यावी. या कृषी विभागाच्या सूचना शेतकऱ्यांनी लक्षात घ्याव्यात म्हणजे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक होणार नाही.

घरच्या घरी बियाणे कसे तपासावे ?

पेरणीपूर्वी आपल्या बियाणांची उगवणशक्ती तपासणे महत्वाचे असते. घरच्या घरी या बियाणांची साधी आणि सोपी पद्धत असते. एका गोणपाटावर धान्यातून सरसकट १०० दाणे , दिड ते दोन सेंमी अंतरावर १०-१० च्या रांगेत ओळीत ठेवावेत. त्याच्यावर दुसरे गोणपाट टाकून त्याचा गुंडाळा करावा. ६-७ दिवस पाणी मारल्यानंतर  त्यातील किती दाणे जोमदार उगवतात याची टक्केवारी काढावी. त्या प्रमाणात किती बियाणे लागते हे ठरवावे.

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रखतेदेवेंद्र फडणवीससंसेदेचे पावसाळी अधिवेशनविधानसभा