Join us

बोअरवेलसह विहिरीने गाठला तळ, फळबागांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची शेततळ्यांवर मदार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 4:00 PM

शेततळ्यातील पाणीदेखील जूनपर्यंत पुरेसे असेल याची शाश्वती नसल्याचे दिसून येत आहे.

मागील वर्षी अंबड तालुक्यात कमी पाऊस झाल्याने विहीर व बोअरवेलने तळ गाठला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील हस्तपोखरी परिसर हा फळबागांचे आगार समजला जातो. मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, पेरू, सिताफळ, ऊस आधी पिके या भागात घेतात; परंतु मागील वर्षी अल्प पाऊस झाल्याने बागा जगवाव्यात कशा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे आहेत त्यांना पाण्याची टंचाई कमी प्रमाणात जाणवत आहे. परंतु, शेततळ्यातील पाणीदेखील जूनपर्यंत पुरेसे असेल याची शाश्वती नसल्याचे दिसून येत आहे.पाणी कमी होत असल्याने अनेकांनी आडवे, उभे बोअर विहिरीत मारणे सुरू केले आहे. पाणी पातळी खोल गेल्याने काहीच उपयोग होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. कमी जास्त क्षेत्रानुसार अनेक शेतकऱ्यांकडे शेततळे आहेत. काही शेतकऱ्यांचे शेततळे पूर्णपणे भरले आहे तर, काहींमध्ये अर्धवट पाणी आहे. शेततळ्यांमध्ये असणाऱ्या पाण्यावरच व्यवस्थापन करून फळबागा जगवण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत.गहू, हरभरा, उन्हाळी बाजरी शेतकरी रब्बी हंगामात घेतात. परंतु पाणी कमी पडत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. अनेक शेतकऱ्यांनी धनगरप्रिंप्री येथील तलावातून वाहिनीद्वारे पाणी आणले असून शेततळे भरत आहेत. पावसाळ्याला अद्याप चार महिने बाकी असल्याने फळबागा वाचविण्याचे नियोजन सुरू केले आहे. फळबागांचा विचार केला असता मोसंबी, द्राक्ष, डाळिंब फळांना जास्त पाण्याची गरज असते. परंतु विहिरी बोअरवेलचा पाणीसाठा कमी झाल्याने बागा वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. परराज्यातून विहिरी खोदण्यासाठी मजूर आले आहेत. काही भागात बागायतदारांनी नवीन विहिरीचे काम सुरू केले आहे. मजुरांच्या मजुरीचे दर वाढल्याने बागायतदारांची डोकेदुखी वाढली आहे. मजुरी परवडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

शेततळ्यावरच भिस्त

माझ्याकडे मोसंबीची एक हजार झाडे, द्राक्ष व डाळिंब, सिताफळांची बाग आहे. पाण्याची टंचाई सुरु असल्याने पाणी वापराचे नियोजन सुरू आहे. बागांना पाणी देण्यासाठी शेततळ्यावरच भिस्त आहे.- ज्ञानेश्वर जगताप, शेतकरी हस्तपोखरी.

टॅग्स :शेतीपाणीफलोत्पादन