BT cotton new variety :
राजरत्न सिरसाट
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने रसशोषण किडीला सहनशील संकरित बीटी कपाशीचे नवे वाण विकसित केले आहे. हेक्टरी २९ क्विंटल उत्पादन देणाऱ्या वाणाचे सध्या कृषी विद्यापीठासह राष्ट्रीयस्तरावर चाचणी घेतली जात असून, येत्या दोन वर्षात हे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध केले जाणार आहे.
सोयाबीन नंतर राज्यात ४५ लाख हेक्टरवर कपाशीची पेरणी केली जात असून, यातील अर्धे क्षेत्र विदर्भात आहे. या अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बीटी कपाशीचे संशोधन हाती घेतले आहे, एकेएचएच- २०२२-१ आणि २ असे या वाणाचे नामकरण करण्यात आले आहे.
१५० दिवसात येणाऱ्या या कपाशीच्या संपूर्ण वेचणीनंतर रब्बी हंगामातील गहू व हरभरा हे दुबार पीक घेता येणार आहे. परंतु यासाठी शेतकऱ्यांकडे सिंचन व्यवस्था असणे गरजेचे असल्याचे कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.
या वाणासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज) महामंडळासोबत या कृषी विद्यापीठाने करार केला आहे. अतिघनता या प्रमाणे पेरणी ३ बाय १५ या प्रमाणे या कपाशी बियाण्याची (वाण) पेरणी केल्यास हेक्टरी २९.६२ क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे, असा दावा येथील कापूस संशोधकांनी केला आहे.
नवे तंत्रज्ञान
या कपाशीच्या झाडाला उत्तम कापूस धरण्यासाठीचे नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून, यात कपाशीच्या झाडाचे शेंडे कापणे, गळफांद्या कापणीचा प्रकार आहे. यामुळे कपाशीच्या बोंड्या अधिक लागून उत्पादनात वाढ होते, असाही दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
संकरीत बीटी कपाशीच्या वाणावर राष्ट्रीय स्तरावर चाचणी सुरू असून, रसशोषण किडीला सहनशील आहे. अतिघनता या प्रमाणे पेरणी केल्यास हेक्टरी भरघोस उत्पादन अपेक्षित आहे. -डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला