बाजारात उपलब्ध असलेल्या विविध कंपन्यांचे आणि ब्रँडसचे बीटी कापूस बियाणे (Bt cotton Seed) एकाच आई-वडीलांपासून (पॅरेटल लाईन) तयार झाले आहेत. त्यांचा वाढीचा काळही जवळपास १४० ते १५० दिवस असा सारखाच असताना केवळ जाहिरातीला किंवा कुणाच्या सांगण्याला भुलून शेतकऱ्यांनी विशिष्ट कंपनीच्या किंवा विशिष्ट ब्रँडच्या बीटी कपाशी बियाणांचा आग्रह धरू नये असे आवाहन कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.
मॉन्सून चांगला पडणार अशा बातम्या आलेल्या असताना शेतकऱ्यांना आता पेरणीचे वेध लागले आहेत. आपल्या पसंतीच्या कंपनीचे बियाणे व खतांसाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रांपुढे रांगा लावत आहेत. अशाच एका घटनेत अकोला जिल्ह्यात बियाणे खरेदीसाठी प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याची घटना घडली असून शेतकऱ्यांमध्ये हाणामाऱ्याही झाल्या आहेत. तर अनेक ठिकाणी पाचशे ते हजार रुपये जास्त मोजून शेतकऱ्यांरी काळ्या बाजारात बियाणे खरेदी करत आहेत. मात्र त्यातून बनावट बियाणे मिळणे, पावती न देणे यातून शेतकऱ्यांचीच फसवणुक होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
बीटी जीन्स सारखेच
यासंदर्भात सियामचे (सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र) कार्यकारी संचालक डॉ. शालीग्राम वानखेडे यांनी सांगितले की बीटी बियाणांमध्ये बीटी जीन हा सारखा असतो, मात्र कंपन्यांच्या वाणानुसार त्यातील गुणधर्मात फरक असतो. बरेचदा हवामान, जमीन आणि भौगोलिक परिस्थिती यानुसार शेतकऱ्यांना विशिष्ट कापूस बियाणांचा चांगला अनुभव येतो. त्यामुळे त्या वाणाची मागणी वाढते. याशिवाय कंपन्यांची जाहिरातबाजीही वाणांच्या निवडीला कारणीभूत ठरते. बियाणांच्या जाहिरातीला भुलूनही शेतकरी विशिष्ट वाणासाठी गर्दी करतात. त्यामुळे त्यांना विशिष्ट वाणासाठी गर्दी करण्यापासून परावृत्त करणे अवघड असते. सर्वंकष जाणीव जागृती झाल्यास शेतकरी एकाच प्रकारच्या बियाणांसाठी गर्दी करणार नाही. पाण्याची उपलब्धता पाहून शेतकरी कमी-जास्त कालावधीची बियाणे निवडतात. या संदर्भात कृषी विभागाने त्यांचे सखोल प्रबोधन करणे गरजेचे आहे.
आक्रमक जाहिरातबाजीला भुलतात शेतकरी
कपाशीच्या बियाणे कंपन्यांची आक्रमक जाहिरातबाजी होत असल्याने त्याचा शेतकऱ्यांवर प्रभाव पडतो. मात्र एकाच प्रकारच्या मातृबियाणांपासून (पॅरेंटल लाईन) बियाणे तयार होत असल्याने सर्वच कपाशीचे वाण हे सारख्याच गुणधर्माचे असते. अनेकदा कमी कालावधीत उत्पादन देणाऱ्या कपाशी वाणाची जाहिरात कंपन्या करतात. मात्र कुठल्याही वाणाचे किंवा कंपनीचे कपाशी बियाणे १४० ते १५० दिवसांपेक्षा कमी कालावधीत उत्पादन देत नाही, हे शेतकऱ्यांनी समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी रांगा लावण्यापेक्षा आपली गरज ओळखून बियाणे खरेदी करावी असे आवाहन राज्याचे कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) विकास पाटील यांनी केले आहे.
गर्दीमुळे कंपन्यांचा वाढतो धंदा
बरेचदा काही कंपन्या जाहिरात करून प्रत्यक्ष बाजारात कमी प्रमाणात संबंधित बियाणे पाठवतात. अशा वेळी जेव्हा शेतकरी संबंधित वाणाची खरेदी करायला जातात, तेव्हा ते संपलेले असते किंवा त्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचे चित्र तयार होते. परिणामी संबंधित दुकानावर किंवा कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होते. ही गर्दी झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या की संबंधित कंपनीचे वाण प्रसिद्ध होऊ इतर शेतकऱ्यांना वाटते की हे वाण चांगले आहे. त्यामुळे तेही खरेदीसाठी गर्दी करतात. त्यातून संबंधित कंपनीचे उखळ पांढरे होते. त्यामुळे गर्दी असेल त्या वाणाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
यंदा कृषी विभागाने बियाणांचा काळाबाजार आणि शेतकऱ्यांची फसवणूक टळावी म्हणून संबंधित कृषी केंद्रात कृषी सहायकांची नेमणूक केली आहे. कृषी सहायक असल्याशिवाय संबंधित केंद्राला बियाणे विक्री करता येणार नसल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. मात्र यातून कृषी सहाय्यक उपस्थित झाला नाही, तर शेतकऱ्यांना वेळेत बियाणे मिळतील का? असा प्रश्न बियाणे उत्पादकांनी उपस्थित केला आहे. तर शेतकऱ्यांनी आपल्याकडील पाण्याची उपलब्धता, पाऊसमान, जमिनीचा पोत हे समजून घेऊन कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच कपाशीच्या बियाणांची खरेदी करावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.
अनुकरण करणे टाळा
दरम्यान शेतकरी गटशेतीचे प्रचारक पैठण तालुक्यातील देवगावचे प्रयोगशील शेतकरी दीपक जोशी यांनी सांगितले की अनेकदा गावातील कुणी ओळखीचे, भाऊबंद किंवा नातलगाने एखाद्या वाणाची खरेदी केली, तर संबंधित शेतकरीही त्याच वाणाचा आग्रह धरतात. कपाशीच्या बाबतीत हा अनुभव वारंवार येतो. मात्र प्रत्यक्षात तितके उत्पादन मिळेलच याची शाश्वती नसते. कारण कपाशीचे उत्पादन हे पन्नास टक्के वाणावर आणि पन्नास टक्के हवामानावर व शेतकऱ्याच्या मेहनतीवर व प्रयोगावर अवलंबून असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी उगाच गर्दी करून एकमेकांशी भांडणे करून सौहार्द बिघडवून घेऊ नये.
बियाणे खरेदी करताना अशी घ्या काळजी
- गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे व खते खरेदीस प्राधान्य द्यावे. पावतीसह खरेदी केल्यास बनावट व भेसळयुक्त बियाणे असण्याचा धोका टाळता येतो.
- पावतीवर बियाण्यांचा, खतांचा संपूर्ण तपशील जसे पीक, वाण, संपूर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, खरेदीदाराचे पूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याचे नाव नमूद असल्याची खात्री करावी.
- खरेदी केलेल्या बियाण्याचे वेष्टन पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे, खते पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे.
- भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांची, खतांची पाकीटे सिलबंद, मोहोरबंद असल्याची खात्री करावी. खरेदी करताना पाकीटांवरील अंतिम मुदत तपासून घ्यावी.
- खरेदी केलेली बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी. बियाण्याची निवड ही जमीन व ओलीताची साधने लक्षात घेऊन करावी.
- कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.