नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रांने मागील दोन वर्षात २०२२-२३ व २०२३- २४ मध्ये सात बीटी वाणाचे संशोधन केले आहे. या हंगामामध्ये या संशोधन केंद्राद्वारे बीटी कपाशीचे तीन सरळ वाण (एनएच १९०१ बीटी, एनएच १९०२ बीटी व एनएच १९०४ बीटी) यावर्षी कापूस लागवडीसाठी बाजारात उपलब्ध होणार आहेत.
बाजारा उपलब्ध झालेल्या वाणाशिवाय एक अमेरिकन वाण (एनएच ६७७) व दोन देशी (गावरान) सरळ वाण (पीए ८३७ व पीए ८३३) असे सात वाण विकसित केले आहेत. या वाणांची मध्य भारतात लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. येथील कापूस संशोधन केंद्र हे कपाशीचे राज्यातील प्रमुख संशोधन केंद्र मानले जाते.
या संशोधन केंद्रात मागील ८३ वर्षांपासून कापसाच्या विविध वाणावर संशोधन सुरू आहे. या संशोधन केंद्रात आजवर देशी व अमेरिकन कपाशीचे एकूण २९ सरळ व संकरीत वाण विकसित केले असून, एनएचएच ४४ (नांदेड ४४) हे त्यापैकीच एक प्रमुख वाण आहे.
देशभरात २२ प्रमुख संशोधन केंद्र
■ देशभरात कपाशीच्या प्रकल्पांतर्गत २२ प्रमुख संशोधन केंद्रे व १० उपकेंद्रे कार्यरत आहेत.
■ नांदेडच्या कापूस संशोधन केंद्राने पीक लागवड व संरक्षणविषयी शेतकऱ्यांच्या गरजेनुसार अनेक शिफारशी वेळोवेळी केलेल्या आहेत.
■ शेतकऱ्यांनी बीटी कापूस लागवड सुरुवात केल्यापासून त्याचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी शेतकऱ्यांना या संशोधन केंद्राद्वारे शिफारस करण्यात आली होती.
■ विकसित केलेल्या बीटी वाणांची कपाशीपासून सरकी वेगळी करून पुढील वर्षी बियाणे म्हणून वापरता येते.
बोंडअळीसाठी ठरणार वाण प्रतिकारक
नांदेड येथील केंद्रात मोठ्या आकाराच्या सरळ व संकरीत वाणाची पैदास करणारे सधन लागवडीसाठी अनुकूल वाणांची पैदास उत्पादन वाढ करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे. तसेच गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन तंत्रज्ञान या विषयावर संशोधन करण्यात येत आहे. नांदेड संशोधन केंद्राने विकसित केलेले तीनही वाण हे बीटी स्वरूपातील असल्याने हिरवी बोंडअळी व ठिपक्याची बोंडअळी यांना प्रतिकारक ठरणार आहे.