Join us

महाराष्ट्रात पहिल्यांदाच कापुस पिकात बीटी सरळ वाण विकसित

By बिभिषण बागल | Published: August 31, 2023 10:07 PM

सरळ वाण बीटी मध्‍ये परावर्तीत करणारे परभणी कृषि विद्यापीठ राज्‍यातील पहिले कृषि विद्यापीठ ठरले आहे, ही विद्यापीठाकरिता अभिमानाची बाब आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेले तीन अमेरिकन बीटी सरळ वाण व देशी कपाशीच्या एका सरळ वाणाची राष्‍ट्रीय वाण निवड समितीद्वारे लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. विद्यापीठांतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राद्वारे विनियंत्रीत बीटी (क्राय १ एसी जनुक) तंत्रज्ञानयुक्त वाणांची पैदास करण्याचे कार्य सुरू असुन याद्वारे निर्मीत एनएच १९०१ बीटी (NH 1901), एनएच १९०२ (NH 1902) बीटी व एनएच १९०४ (NH 1904) बीटी ही तीन अमेरीकन सरळ वाण अखिल भारतीय समन्वयित कापूस सुधार प्रकल्पाच्या केंद्रीय वाण निवड समितीद्वारे नवी दिल्ली येथे नुकत्‍याच झालेल्या बैठकीत मध्य भारत (महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश) विभागाकरिता प्रसारीत करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठांतर्गत परभणी स्थित कापूस संशोधन केंद्र, महेबूब बाग या केंद्राद्वारे निर्मीत देशी कापूस सरळ वाण पीए ८३३ (PA 833) हा वाण देखिल समितीद्वारे दक्षिण भारत विभागाकरिता (आंध्र प्रदेश, कर्नाटक व तामिळनाडू) प्रसारणासाठी शिफारस करण्यात आला आहे.

कुलगुरू मा. प्रा. डॉ. इन्‍द्र मणि आणि संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी कापूस विशेषज्ञ डॉ. के.एस. बेग व वाण विकसित करण्‍याकरीता योगदान देणा-या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ विकसित कापुसाच्‍या सरळ वाणात बीटीचा अंतर्भाव केल्‍यामुळे शेतकरी बांधवाचा बियाणांवर होणारा खर्च कमी होण्‍यास मदत होणार असुन कोरडवाहू लागवडीमध्ये उत्‍पादनात सातत्‍य देणारे वाण आहेत. महाराष्‍ट्राबाहेरही गुजरात व मध्‍यप्रदेश या राज्‍यात या वाणाची लागवडीकरिता मान्‍यता दिली आहे, सरळ वाण बीटी मध्‍ये परावर्तीत करणारे परभणी कृषि विद्यापीठ राज्‍यातील पहिले कृषि विद्यापीठ ठरले आहे, ही विद्यापीठाकरिता अभिमानाची बाब आहे.

सार्वजनिक क्षेत्रामध्ये बीटी कापूस सरळ वाण प्रसारीत करणारे परभणी कृषि विद्यापीठ हे राज्यातील पहिलेच विद्यापीठ ठरले असुन बीटी कापूस लागवडीस सुरुवात झाल्यापासून खासगी कंपनीव्‍दारे कापुसाच्‍या संकरीत वाण निर्मितीवरच भर होतो. कोणत्याही खासगी कंपनीद्वारे कापूस पीकाचे बीटी सरळ वाणाचे बियाणे लागवडीसाठी उपलब्ध करण्यात आले नाही. सरळ वाणांचे बियाणे उपलब्ध झाल्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या शेतामध्ये मागील वर्षाच्या लागवडीतून उत्पादीत कपाशीपासून सरकी वेगळी करून तीच सरकी पुढील तीन वर्षांपर्यंत बियाणे म्हणून वापरता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दरवर्षी नवीन बियाणे बाजारातून खरेदी करण्याची आवश्‍यकता पडणार नाही आणि पर्यायाने बियाण्यावरील खर्च कमी होईल.

प्रस्तुत वाण हे सरळ वाण असल्यामुळे त्यांना रासायनिक खतांची गरज संकरित वाण पेक्षा कमी लागते. विद्यापीठ विकसित ही वाण रसशोषण करणार्‍या किडींना सहनशील असल्यामुळे कीड संरक्षणासाठी होणार्‍या खर्चामध्ये कपात करता येणार आहे. ही बीटी सरळ वाण कापूस उत्पादनासाठी तुल्यबळ वाणांपेक्षा सरस ठरले असून कोरडवाहू लागवडीमध्ये मध्य भारतामधील विविध केंद्रांवर या वाणांच्या उत्पादनामध्ये सातत्य आढळून आले आहे. हे वाण रसशोषक किडी, तसेच जीवाणूजन्य करपा व पानावरील ठिपके या रोगांकरिता सहनशील आढळून आले. या बीटी सरळ वाणाचा रुईचा उतारा ३५ ते ३७ टक्के असून यांचे धाग्याची लांबी मध्यम, मजबूती व तलमपणा सरस आहे. या वाणांची मध्य भारतातील महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांत लागवडीकरिता शिफारस करण्यात आली आहेत. यापैकी एनएच १९०१ बीटी या वाणाचा रुईचा उतारा ३७ टक्के असून सघन कापूस लागवडीस अनुरूप आहे.

विद्यापीठ विकसित देशी कापूस सरळ वाण पीए ८३३ (PA 833) हा अखिल भारतीय समन्वयित कापूस सुधार प्रकल्पाच्या केंद्रीय वाण निवड समितीद्वारे दक्षिण भारत विभागाकरिता (आंध्र प्रदेश, कर्नाटक व तमिळनाडू) प्रसारणासाठी शिफारस करण्यात आला असुन या वाणाच्या धाग्याची लांबी अधिक व मजबूती सरस आहे.

नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राचे संशोधन कार्य

यावर्षी राहुरी येथे पार पडलेल्‍या संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती २०२३ द्वारे कापूस संशोधन केंद्राद्वारे विकसीत अमेरिकन बिगर बीटी सरळ वाण एनएच ६७७ (NH-677) हा महाराष्ट्र राज्यामध्ये लागवडीसाठी प्रसारीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा वाण रसशोषण करणार्‍या कीडीस सहनशील असून याच्या रुईचा उतारा ३६-३७ टक्के आहे. हा वाण सेंद्रीय लागवडीस उपयुक्त आहे.

नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राद्वारे विकसीत एनएचएच २५० व एनएचएच ७१५ या अमेरिकन संकरीत वाणांचे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला (महाबीज) यांच्या सहकार्याने बोलगार्ड २ स्वरूपात रूपांतरीत करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन कपाशीचे विनियंत्रीत बीटी (क्राय १ एसी व क्राय २ एबी जनुक) तंत्रज्ञानयुक्त स्वरूपातील सरळ आणि संकरीत वाणांची पैदास करण्याचे कार्य चालू असून मोठ्या आकाराची बोंडे, सघन लागवडीस उपयुक्त आणि कमी कालावधीचे वाण कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथे विकसीत करण्यात येत आहेत.

टॅग्स :कापूसवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणीपीकखरीपशेतकरीशेती