नैसर्गिक दृष्टचक्राचा फटका दरवर्षी आंबा उत्पादनाला बसत आहे. स्थानिक हापूस बाजारात आला असून, पर्यटक व मुंबईकरांकडून हापूसला वाढती मागणी आहे; मात्र काही विक्रेते रत्नागिरी हापूस सांगून ग्राहकांच्या माथी चक्क कर्नाटक हापूस मारत आहेत.
नैसर्गिक मधुर स्वाद व अवीट गोडीमुळे हापूसला वाढती मागणी आहे. रत्नागिरीतील हापूसची लागवड कर्नाटक राज्यात करण्यात आली आहे. दोन्ही हापूसचा हंगाम एकाचवेळी असतो. त्यामुळे बाजारात दोन्ही प्रकारचा हापूस विक्रीला असतो.
रंग, आकार, सुगंधाबाबतीत ग्राहक गोंधळतात. रत्नागिरी हापूस समजून कर्नाटक हापूस विकत घेतात. कमी पैशात मिळाल्याचे ग्राहकांना समाधान तर रत्नागिरी हापूसच्या नावे चक्क कर्नाटक हापूसची विक्री करून दामदुप्पट पैसे मिळविल्याबद्दल व्यापारी समाधानी असतात. यामध्ये ग्राहक मात्र भरडला जातो.
कोकणच्या हापूसला भौगोलिक निर्देशांक प्राप्त झाला आहे. त्यामुळे बागायतदारांनी जीआय मानांकनासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे; मात्र अद्याप कित्येक बागायतदारांनी नोंदणी केलेली नाही. विक्रेता याचा गैरफायदा घेत आहेत. ग्राहकांना सुरुवातीला दर रत्नागिरी हापूसचा सांगितला जातो.
ग्राहक व विक्रेता यांच्यात दरावरून घासाघीस सुरू होते. दर कमी करून ग्राहकांच्या मागणीप्रमाणे हापूस बॉक्समध्ये पॅकिंग करून दिला जातो. ग्राहकांना दर कमी झाल्याचा आनंद वेगळाच असतो; मात्र आपली आंबा खरेदी करताना झालेली फसगत प्रत्यक्ष आंबा खाल्ल्यानंतरच लक्षात येते.
विक्रेत्यांकडून स्टॉलवर हापूसची मागणी अशी करण्यात येते की, रत्नागिरी व कर्नाटकचा हापूस कोणता आहे, सहजासहजी ओळखता येत नाही; मात्र दरात कमालीचा फरक असल्याने ग्राहकांची हापूस नावे फसगत होत आहे. स्थानिक व्यापारी असा व्यवहार करत नाहीत; मात्र बाहेरून येऊन आंबा विक्री करणारे लोक व्यवहार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. आंबा ओळखता येणे आवश्यक आहे.
रत्नागिरी हापूस ओळखावा कसा?• हा आकाराने गोलाकार असतो.• साल पातळ असते.• देठाकडे पिवळसर असतो.• पिकल्यानंतर २ ते ३ दिवसात काळे डाग पडू लागतात.
कर्नाटक हापूस ओळखावा कसा?• हा हापूस उभट असतो.• साल जाड असते.• देठाकडे केशरी, लाल रंग असतो.• चार ते पाच दिवस टिकतो.
प्रति डझन दररत्नागिरी हापूस - ७०० ते ९००कर्नाटक हापूस - ४५० ते ५००
कोकणातून हापूस आंब्याची कलमे नेऊन कर्नाटक राज्यात लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही हापूसचा हंगाम एकाचवेळी सुरू होतो; परंतु दोन्ही आंब्याच्या चवीमध्ये फरक आहे. आंबा खाल्यानंतरच लक्षात येते. कमी पैशात ग्राहकांना कर्नाटक हापूस देऊन फसवणूक केली जाते, यावर निर्बंध आणणे गरजेचे आहे. बागायतदारांचेही नुकसान होत आहे. - सुरेश मोहिते, बागायतदार