वर्षानुवर्षे भात आणि ऊस पिकविणारा कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी आता नगदी पिकाकडे वळू लागला आहे. कडवी नदीच्या तीरावर वसलेल्या पेरीड गावातील शेतकरी रताळ्याची शेती मोठ्या प्रमाणात करत आहेत. वर्षाला या रताळी विक्रीतून गावात वर्षाला ३ कोटी रुपयांची उलाढाल होते. पेरीड गावात २५० हेक्टरवर रताळी पीक घेतले जाते.
दसरा ते दीपावलीदरम्यान पेरीड गावात रताळी काढण्याचा हंगाम सुरू होतो. चालू वर्षी अनियमित पावसामुळे २५ टक्के उत्पादनात घट झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून रताळे येथील ग्रामस्थांच्या अर्थकारणाला उभारी देणारे ठरत आहे. शाहूवाडीच्या पश्चिम भागातील लाल मातीतील रताळ्यांना मोठी मागणी असून ती मुंबई, गुजरात, पुणे, नवी मुंबई, कऱ्हाड या बाजारपेठेत विकली जातात.
जिल्ह्यात शाहूवाडी, चंदगड, राधानगरी या तीन तालुक्यांत रताळी हे पीक घेतले जाते. त्यातही शाहूवाडी तालुक्यातही मोठ्या प्रमाणात रताळे घेणारे गाव म्हणून पेरीडची ओळख आहे. गावात सुमारे २५० हेक्टरहून अधिक क्षेत्र या पिकाच्या लागवडीखाली आले आहे. सणासुदीच्या काळात हमखास दर मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत रताळ्यांना या गावातील लोकांनी पसंती दिली आहे.
रताळे काढण्याचा हंगाम गणेशोत्सव ते दसरा, दीपावलीपर्यंत सुरू असतो. नवरात्रीच्या काळात दररोज मागणी असल्याने घटस्थापनेच्या दोन दिवस आधीपासून ते दसरा होईपर्यंत दहा ते बारा दिवस रताळे काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असते. या काळात वीस ते तीस रुपये दर मिळतो. पावसाचे प्रमाण कमी असल्यास एकरी एक ते सव्वाटन उत्पादन मिळते. रताळ्यांना निचरा होणारी जमीन अनुकूल ठरते. रताळी वेलाची लावण केल्यानंतर तीन महिन्यांत हे पीक काढणीसाठी येते. रताळी काढणी टॅक्टर, रोटावेटर, औताच्या सहाय्याने काढली जातात. ती पाण्याने धुऊन स्वच्छ करून पोत्यात भरली जातात व बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवली जातात.