शीतलकुमार कांबळे
सोलापूर येथील विजापूर रोड परिसरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव, श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर, सोनी नगर परिसरात चार दिवसात २२ कावळ्यांचा मृत्यू झाला.
कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लू, व्हायरल इनफेक्शन, फूड पॉयझन किंवा उष्माघाताने झाला का, याचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच कारण स्पष्ट होणार आहे.
बुधवार ६ मार्च ते ८ मार्च दरम्यान या चार दिवसात झालेला कावळ्यांचा मृत्यू हा पक्षीप्रेमींसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे तलाव व परिसरातच हे मृत्यू झाले आहेत. परिसरात पाणी आणि झाडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कावळ्यांसह इतर पक्ष्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात असतो.
सहा मार्च रोजी मृत झालेल्या कावळ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात यकृतावर परिणाम, उष्णतेमुळे तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले. शनिवार ८ मार्च रोजी मृत झालेले पक्षी हे भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत रविवारी पाठविण्यात येईल.
पक्ष्यांचा मृत्यू कशामुळे होत आहे, याचा अंदाज लावणे सध्या तरी शक्य नाही. मागील काही दिवसांपासून अशा घटना रोज घडत आहेत. हा प्रश्न फक्त कावळ्यापुरता मर्यादित नसून इतर पक्ष्यांच्या परिस्थितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. - भरत छेडा, मानद वन्यजीव रक्षक.
महात्मा गांधी प्राणी संग्रहालय, छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय आदी परिसरातच अशा घटना घडल्या आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे स्पष्ट होईल. - मुकुंद शेटे, पक्षी अभ्यासक.
फक्त कावळे मृत्युमुखी पडल्याचे दिसत आहे. कोंबडी, बदके आदींबाबत तशी परिस्थिती नसून हे पक्षी मृत झाले नाहीत. भोपाळ येथील प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच कावळ्यांच्या मृत्यूचे खरे कारण कळेल. सध्या आपण दक्षता घेत असून जिल्ह्यातील तलाव, धरण परिसरात स्थानिक तसेच परदेशी पक्ष्यांच्या स्थितीकडे लक्ष देण्यात येत आहे. - डॉ. भास्कर पराडे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन.