निचरा असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनीत कोबीचे पीक घेता येते. हलक्या जमिनीत सेंद्रिय खतांचा भरपूर पुरवठा करून हे पीक घेता येते. कोबीची लागवड नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्य शेतात करावी. कोबीची रोपे नर्सरीतून उपलब्ध होत आहेत. कोबीच्या गोल्डन एकर, प्राइड ऑफ इंडिया, पुसा ड्रमहेड, कोपन हेगन, गंगा, पुसा, सिंथेटिक, श्री गणेश गोल, हरी राणी, कावेरी, बजरंग या सुधारित जातींची लागवड करावी.
लागवड पद्धती आणि लागवडीचे अंतररोपे गादी वाफ्यावर तयार करावीत. बी वाफ्यावर समांतर १२ ते १५ सेंटीमीटर अंतरावर ओळीत पेरावे व मातीने अलगद झाकावे. हेक्टरी ४०० ते ५०० ग्रॅम बियाणे पुरेसे होते. रोपांच्या लागवडीसाठी शेत नांगरून, कुळवून ढेकळे फोडून तयार करावे. रोपांची लागवड सरी वरंब्यावर किंवा सपाट वाफ्यावर करावी. रोपे लागवडीपूर्वी एक टक्का युरियाच्या द्रावणात किंचित काळ बुडवावीत. रोपांची लागवड ४५ बाय ४५ सेंटीमीटर किंवा ६० बाय ६० सेंटीमीटर अंतरावर करावी.
खत व्यवस्थापनकोबी पिकास हेक्टरी २० टन शेणखत, १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व पालाश खतांची मात्रा, ४० किलो नत्र लागवडीच्या वेळी व उरलेले नत्र दोन ते तीन वेळा समप्रमाणात विभागून द्यावे. लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी रोपांवर एक टक्का युरियाचा पहिला फवारा व ४० दिवसांनी दुसरा फवारा द्यावा. लागवडीनंतर साधारणपणे २० ते २५ दिवसांनी खुरपणी करावी. खुरपणी करताना रोपांना मातीची भर द्यावी. पुनर्लावणीनंतर वाढीच्या काळात खालची १ ते २ पाने काढावीत.
पिक संरक्षणकोबीच्या पिकास मावा, हिरव्या अळ्या, गड्डा पोखरणारी अळी, लाल कोळी या किडींपासून आणि करपा, काळीकूज, क्लम्पॉट या रोगापासून उपद्रव होतो. त्याकरिता गड्डे धरल्याबरोबर एक मि.ली. ५० टक्के मॅलेथिऑन २.५ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा झायनेब २.५ ग्रॅम प्रति लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या फवारण्या १० ते १२ दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळा कराव्यात. कोबीचा गड्डा पूर्ण तयार झाल्यावर बोटाने दाबल्यास दबत नाही. अशावेळी कोबीची काढणी करावी. कोबीचे हेक्टरी २० ते २५ टन उत्पन्न मिळते. थंडीच्या कालावधीचा विचार करून योग्य जातीची निवड करून लागवड करावी. त्याप्रमाणे खतांचा योग्य प्रमाणात पुरवठा करावा. कोबीवर्गीय नवलकोलची लागवडही या दिवसात करून उत्पन्न मिळविता येते.
बियाणे निवड महत्वाचीव्हाईट व्हिएन्ना, पर्पल व्हिएन्ना, पर्पल टॉप, अर्ली व्हाईट, किंग ऑफ मार्केट या नवलकोलच्या प्रचलित जाती आहेत. लागवडीसाठी शेतकऱ्यांनी योग्य निवड करणे गरजेचे आहे. लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी खुरपणी करावी. खुरपणी करताना मातीची भर द्यावी. या पिकासाठी हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ५० किलो पालाश, १५ टन शेणखत द्यावे. नवलकोलच्या पिकाला मावा, तुडतुडे, फुलकिडे या किडींपासून व करपा (अल्टरनेरिया) या रोगापासून उपद्रव होतो. पुनर्लावणीनंतर १० ते १५ दिवसांनी पहिली फवारणी करावी.