Pune : महाराष्ट्र राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने शेतकऱ्यांसाठी, तरूणांसाठी मत्स्यव्यवसाय शिकण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. पुण्यातील कृषी महाविद्यालयात पिंजरा मत्स्यसंवर्धनाचे मोफत तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जास्तीत जास्त इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, पिंजरा मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञान किफायतशीर होण्यासाठी पिंजरे स्थापित केल्यानंतर प्रत्यक्ष मत्स्यबीज संचयनापूर्वी पूर्वतयारी बरोबरच मत्स्यसंवर्धनामध्ये खाद्य व्यवस्थापन, माशांचे आरोग्य व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने करणे गरजेचे असते. उत्पादनाबरोबर विक्री व्यवस्थापन देखील महत्त्वाचे आहे. पिंजरा मत्स्यसंवर्धनाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने हे पाऊल उचलले आहे.
या तीन दिवसीय कार्यशाळेमध्ये शास्त्रज्ञ, प्राध्यापक, तज्ज्ञ अधिकारी व अनुभवी पिंजरा संवर्धक यांच्याकडून सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे. यासोबतच ज्या ठिकाणी पिंजरा मत्स्यसंवर्धन केले आहे त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहेत.
या प्रशिक्षणामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छ. संभाजीनगर, बीड व परभणी या ८ जिल्ह्यातील पिंजरा मत्स्यसंवर्धनाचे प्रकल्प असलेल्या लाभार्थींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कधी व कुठे?
ही तीन दिवसीय कार्यशाळा २५ मार्च ते २७ मार्च हे तीन दिवस घेण्यात येणार आहे. पुणे कृषी महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीच्या उजव्या हॉलमध्ये ही कार्यशाळा घेण्यात आली असून २६ मार्च रोजी प्रत्यक्ष पिंजरा मत्स्यसंवर्धन केलेल्या ठिकाणी प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार आहेत. २७ मार्च रोजी पुन्हा कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण दिले जाणार आहे.