राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीवरही मंत्रिमंडळाच्या बैठकीत गंभीर चर्चा झाली. पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने पीक विम्याचा आग्रीम हप्ता २५ टक्के देता येईल का, या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महाराष्ट्रात १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे.
ज्या ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती आहे त्या ठिकाणी चारा छावण्या, पिण्याचे पाणी आणि इतर पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ८१.०७ टक्के पाऊस झाला आहे. १ ते ६. सप्टेंबरदरम्यान सरासरीच्या केवळ १३.६० टक्के पाऊस पडला आहे. २५७९ पैकी ४४६ महसुली भागात २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला आहे.
२४ दिवसांनंतर पाऊस
नंदुरबार जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर बुधवारी पावसाचे पुनरागमन झाले. नंदुरबार जिल्हाभरात पावसाने हजेरी लावल्याने करपणाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. अनेक भागांत पावसाचा जोर चांगला असल्याने दीड महिन्यानंतर नदी, नाले प्रवाही झाले.
धुळे जिल्ह्यातही सायंकाळी वादळी वान्यासह पुनरागमन झाले. सुमारे पाऊण तास पाऊस झाला. धुळ्यासह शिरपूर, शिंदखेडा, निजामपूर, मालपूर आदी भागांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. असे असले तरी सर्वदूर पावसाची प्रतिक्षा कायम आहे.