Join us

Carbon Credit : शेतकऱ्यांनो झाडे जगवा आणि कार्बन क्रेडिट मिळवा, कसे ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 10:57 AM

(Carbon Credit)

Carbon Credit :

निसर्गाने कुठलाही खर्च न करता कार्बन कमी करण्याचे नैसर्गिक यंत्र दिले आहे, ते म्हणजे वृक्ष. एक झाड लाखो पटीने वातावरणातील कार्बन कमी करतो. त्यामुळे ज्याने झाड लावले, संगोपन करून मोठे केले, त्यांना कार्बन कमी करण्याचे 'क्रेडिट' मिळायला हवे. 

शेतकऱ्यांना वृक्षारोपणाद्वारे कार्बन क्रेडिटचा लाभ मिळावा, यासाठी नागपूर जिल्हा कृषी विभाग व स्कायमेटतर्फे सीएसआर निधीतून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. कार्बनचे उत्सर्जन हा जगाला भेडसावणारा प्रश्न आहे.

जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी व्हावे म्हणून जगभरातील वैज्ञानिक दिवस-रात्र प्रयत्न करीत आहेत. मात्र अधिकाधिक वृक्षारोपण केले तर कार्बनची समस्या मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकते. शेतकऱ्यांना जर कार्बन क्रेडिटचा लाभ मिळाला तर त्यांना प्रोत्साहन मिळेल व  वृक्षारोपणाला महत्त्व येईल, ही बाब ओळखून जिल्हा कृषी विभाग व स्कायमेटने हा प्रकल्प सुरू केला आहे.

कुही तालुक्यातील साळवा या गावी या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, तालुका कृषी अधिकारी राजेश जारोडे, स्कायमेटचे प्रकल्प प्रमुख संजय मोरे, विभागीय व्यवस्थापक भूषण रिनके, पराग जाधव तसेच जर्मनीच्या व्होल्क्सवॅगन टीमचे कायदेशीर सल्लागार मॅक्स व्हॅनिकोव्ह, व्यवस्थापक कॅथरिन हेगर व प्रकल्प विकासक सिमाना सुब्रमण्यण प्रामुख्याने उपस्थित होते.

या अंतर्गत शेतकऱ्यांना मोफत रोपटे व खतपाणी देण्यात येईल. शेतकऱ्याने ते झाड जगविल्यास भविष्यातील प्रमाणानुसार त्यांना कार्बन क्रेडिटचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती स्कायमेटचे भूषण रिनके यांनी दिली. 

ही योजना केवळ नागपूर जिल्ह्यात नाही तर राज्यभरात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. संस्थेने ५ हजार हेक्टरमध्ये वृक्षारोपण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. शेतकऱ्यांची मागणी व जमिनीच्या प्रकारानुसार त्यांना झाडांचे रोपटे पुरविले जातील; मात्र शेतकऱ्यांची नोंदणी अधिक झाल्यास मर्यादा आणखी वाढेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकृषी योजना