Join us

काजू पिक दिवसेंदिवस बनत आहे खर्चिक; टी मॉस्क्युटो बरोबरच आता फळमाशी ही आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:07 IST

काजू पीक लागवडीनंतर उत्पादनासाठी फारसा खर्च करावा लागत नाही, हा समज आता गैरसमज ठरू लागला आहे. आंब्याप्रमाणे बदलत्या हवामानाचा परिणाम काजू पिकावर होत आहे.

मेहरून नाकाडेरत्नागिरी: काजू पीक लागवडीनंतर उत्पादनासाठी फारसा खर्च करावा लागत नाही, हा समज आता गैरसमज ठरू लागला आहे. आंब्याप्रमाणे बदलत्या हवामानाचा परिणाम काजू पिकावर होत आहे.

टी मॉस्क्यूटो बग या किडीपाठोपाठ आता फळमाशीचाही प्रादुर्भाव काजू पिकावर झाला आहे. ही फळमाशी काजू बीच्या टरफलासह गरावर हल्ला करीत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी करूनही फारसा प्रभाव जाणवत नसल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत.

काजूची लागवड केल्यानंतर संगोपनासाठी रासायनिक, सेंद्रिय खतांचा वापर काही प्रमाणात केला जातो. पाण्याचे व्यवस्थापन असले की काजू लागवड चांगली बहरते.

कोकण कृषी विद्यापीठ प्रमाणित वेंगुर्ला ४, ५, ६, ७, ९ या वाणांची लागवड सर्रास केली जात आहे. वेंगुर्ला या वाणाच्या लागवडीनंतर चार ते पाच वर्षातच उत्पादन सुरू होते. तुलनेने गावठी काजूचे उत्पादन उशिरा होते.

त्यामुळे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी वेंगुर्ला वाणांची निवड शेतकरी करत आहेत. जिल्ह्यात त्याचीच लागवड अधिक आहे. आतापर्यंत टी मॉस्क्युटो या किडीचा प्रादुर्भाव काजू पिकावर दिसत होता.

कीटकनाशक फवारणीने तो आटोक्यात येत होता. परंतु गतवर्षीपासून फळमाशीचा प्रादुर्भावही काजू पिकावर होऊ लागला आहे. यावर्षी सुमारे ७० टक्के काजू पिकाला फटका बसला आहे.

काजू पिक आकडेवारीलागवडीखालील क्षेत्र - १,११,६२५ (हेक्टर)उत्पादनक्षम क्षेत्र - ९४,६८० (हेक्टर)उत्पादन - १,४२,०२० (मेट्रिक टन)उत्पादकता प्रति हेक्टरी - १.५० टन

नुकसानच पदरातकाजू बीच्या टरफलापासून गरापर्यंत माशी हल्ला करते. ती टरफल पोखरत असल्याने बी काळी पडते. बाजारात या बीला चांगला दर मिळत नाही. विक्रेते तर अशी बी घेतच नाहीत. घेतली तरी दर पाडून देत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

काही वर्षापूर्वी काजू पिकावर जास्त खर्च करावा लागत नव्हता. आंब्याप्रमाणे कीटकनाशक फवारणीची आवश्यकता वाटत नव्हती. मात्र आता काजूसाठीही खत व पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करावे लागत आहे. शिवाय हवामानातील बदलामुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कीटकनाशक फवारणीही करावी लागत आहे. त्यामुळे हे पीकही खर्चिक बनले आहे. - चंद्रकांत पवार

अधिक वाचा: आंब्याप्रमाणेच काजूलाही हवामानाचा मोठा फटका; यंदा उत्पादन ४० टक्क्यावर

टॅग्स :शेतकरीशेतीकीड व रोग नियंत्रणखतेफलोत्पादनफळेरत्नागिरीकोकणविद्यापीठ