Join us

काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दहा रुपयांचे अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 2:00 PM

कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड, आजरा तालुक्यात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, पण त्याला यंदा भाव मिळाला नसल्याने राज्य सरकारने ...

कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड, आजरा तालुक्यात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, पण त्याला यंदा भाव मिळाला नसल्याने राज्य सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे व राज्याचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्याकडे केली होती. गेली तीन महिने सरकारच्या पातळीवर सातत्याने पाठपुरावा केल्याने काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिकिलो दहा रुपयांचे अनुदान मिळाल्याची माहिती ‘गोकुळ’‘चे संचालक डॉ. चेतन नरके यांनी पत्रकातून दिली.

काजू उत्पादकांना अनेक संकटाने सामोरे जावे लागते. त्यांच्यासाठी काजू बोर्डची मागणी गेली अनेक वर्षे सुरू होती. काजू बोर्ड चंदगडलाच व्हावे, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानंतर राज्य सरकारने बाेर्डची स्थापना केली होती. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चंदगड, आजरा भागात गेल्यानंतर तेथील शेतकऱ्यांनी काजूला मिळणारा दर आणि उत्पादन खर्च याचे हिशोब मांडून काजूला अनुदान देण्याची मागणी सरकार दरबारी करावी, अशी सूचना केली होती.

त्यानुसार तीन महिन्यांपूर्वी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर प्रधान सचिव अनुप कुमार यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. काजू अनुदानासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही प्रयत्न केले. त्यातूनच राज्य सरकारने काजूला प्रतिकिलो १० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. काजू बीसाठी प्रतिकिलो दहा रुपयांप्रमाणे किमान ५० किलो तर कमाल २०० किलोपर्यंत अनुदान मिळणार आहे. त्यासाठी २७९ कोटी खर्चास मान्यता दिली आहे.

दृष्टिक्षेपात राज्यातील काजू उत्पादक 

  • उत्पादक जिल्हे : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, पालघर
  • एकूण क्षेत्र : १ लाख ९१ हजार हेक्टर
  • शेतकरी : १ लाख ३९ हजार
  • काजू उत्पादन : १ लाख ८१ हजार टन
  • प्रति हेक्टर उत्पादन : ९८२ किलो
टॅग्स :फलोत्पादनशेतकरीशेती क्षेत्र