Join us

आर्द्रतेच्या निकषांमुळे सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावरही प्रतिसाद मिळेना; खासगी बाजारात कापसाचे दर मात्र कमीच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 1:24 PM

एकीकडे निवडणुकांची (Election) रणधुमाळी सुरू असताना, दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही. शेतकऱ्यांच्या (Farmer) कापसाला (Cotton) चांगला दर मिळत नसल्याने कॉटन बाजारात (Cotton Market) फारसा उठाव नसल्याचे चित्र आहे.

जळगाव : एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही. शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला दर मिळत नसल्याने कॉटन बाजारात फारसा उठाव नसल्याचे चित्र आहे.

त्यातच जळगाव शहरात सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात झाली असली, तरी सीसीआयच्या अटी-शर्तीमुळे शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

यंदा कापूस बाजारात फारशी मागणी नसल्याचे कारण देत, कापसाच्या दर स्थिर आहेत. खासगी बाजारात, तर हमीभावापेक्षा ५०० ते १ हजार रुपये कमी दर मिळत आहेत. त्यामुळे सीसीआयकडून कापूस खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सीसीआयचे एक केंद्र सुरू करण्यात आले आहे.

मात्र, सीसीआयकडून अनेक प्रकारच्या अटी-शर्ती लादण्यात आल्यामुळे त्या केंद्रावरही शेतकरी आपला माल आणणे टाळत आहेत. त्यामुळे सीसीआयच्या या केंद्रावर फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

आर्द्रतेचे निकष, शेतकऱ्यांना हमीभावही मिळेना...

सीसीआयकडून माल खरेदी करत असताना, शेतकऱ्यांना आधी नोंदणी करावी लागणार आहे. तसेच, माल विक्रीला आणताना आर्द्रतेचेही निकष लादण्यात आले आहेत. ८ टक्के किंवा त्यापेक्षा कमी आर्द्रता असेल, तरच शेतकऱ्यांना हमीभावाइतका ७ हजार ५०० रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. तर, ८ ते १२ टक्क्यांपर्यंत आर्द्रतेचे प्रमाण राहिले, तर शेतकऱ्यांना ७ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रतेचे प्रमाण राहिले, तर तो माल सीसीआयच्या केंद्रावर खरेदी केला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद याठिकाणी मिळत नसल्याचे चित्र आहे.

सीसीआयचे केंद्र सुरू आहे. काही प्रमाणात मालाची आवक देखील सुरू आहे. आर्द्रतेच्या प्रमाणानुसार याठिकाणी शेतकऱ्यांना भाव दिला जात आहे. - प्रमोद काळे, सचिव, जळगाव बाजार समिती.

सीसीआयचे केंद्र सुरु झाले आहे. यामुळे खासगी बाजारात जरी कापसाचे दर घसरले, तरी सीसीआयच्या केंद्रावर शेतकऱ्यांना हमीभावाइतका किंवा ७ हजारांपर्यंतचा दर तरी मिळणारच आहे. मात्र, काही प्रमाणात आर्द्रतेचे निकष लावल्यामुळे शेतकरी आपला माल आणत नाहीत. तसेच, शेतकऱ्यांनाही भाव वाढीची अपेक्षा असल्याने सध्या बाजारात उठाव नाही. - प्रदीप जैन, संचालक, खान्देश जिनिंग असोसिएशन.

खान्देशात आतापर्यंत केवळ दीड लाख गाठींची खरेदी...

■ संपूर्ण खान्देशात आतापर्यंत केवळ दीड लाख गाठींची खरेदी झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या २ लाख गाठी इतकी होती, तर नोव्हेंबर २०२२ मध्ये ही संख्या ३ लाख गाठींपर्यंत होती. यंदा अति पावसामुळे कापसाच्या उत्पादनात आधीच घट झाली आहे. त्यात शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने खासगी बाजारातही शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणत नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाचे दर स्थिर आहेत.

हेही वाचा : Market Update : मका व तांदळाच्या ढेपेने केली बाजारात एंट्री; सोयाबीन दर पुन्हा दबावाखाली

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसशेतकरीसरकारविदर्भजळगाव