Join us

Pulses Import : केंद्राकडून ४ लाख टन डाळीची आयात; मागच्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 9:16 PM

एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्यायचा नाही आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर तेलाची आणि डाळींची आयात करायची हे धोरण केंद्र सरकार मागच्या अनेक वर्षांपासून राबवत आहे.

पुणे : एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्यायचा नाही आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर तेलाची आणि डाळींची आयात करायची हे धोरण केंद्र सरकार मागच्या अनेक वर्षांपासून राबवत आहे. यामुळे शेतकरी कडधान्य पिकांवरून नगदी पिकांकडे वळाले आहेत. मागच्या आर्थिक वर्षीच्या सुरूवातीच्या दोन महिन्यांच्या तुलनेत यंदा डाळींच्या आयातीत २० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. 

यंदा आर्थिक वर्षाच्या सुरूवातीच्याच दोन महिन्यामध्ये केंद्र सरकारकडून ३ लाख ७१ हजार ३३४ टन डाळींची आयात करण्यात आली आहे. मागच्या वर्षी याच दोन महिन्यांत ३ लाख ८ हजार ६१९ टन डाळींची आयात करण्यात आली होती. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन महिन्यांमध्ये डाळींच्या आयातीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

देशांतर्गत कडधान्य पिकांच्या आणि डाळींच्या उत्पादनात घट झाल्यामुळे तूर आणि उडीदाच्या मागणीत वाढ झाल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मागच्या खरीप हंगामात उडीदाचे उत्पादन हे २६ लाख मेट्रीक टन एवढे होते तर यंदा म्हणजेच २०२४ च्या खरिपात हे उत्पादन १८ लाख टनापर्यंत खाली येणार असल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर देशात ४५ लाख मेट्रीक टन तुरीची आवश्यकता असते. पण मागच्या हंगामात तुरीचे उत्पादन हे ३३ लाख मेट्रीक टन झाले होते तेच उत्पादन या हंगामात २७ ते २८ लाख मेट्रीक टन होण्याची शक्यता आहे. 

सलग दोन वर्षे उत्पादनात घटअवकाळी पाऊस, मान्सूनच्या पावसात घट, अल निनोचा प्रभाव या कारणांमुळे मागच्या दोन वर्षांमध्ये देशांतर्गत तूर आणि उडीद या पिकांच्या उत्पादनामध्ये घट झाली होती. यामुळे मागच्या हंगामात तुरीचे दर स्थिर राहिले होते. 

तूर आणि उडीद डाळींचे दर वाढलेतूर डाळीचे दर किरकोळ बाजारात २७.३ टक्क्यांनी वाढून १६० रूपये प्रति किलो एवढे झाले आहेत तर ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, उडीद डाळीची सरासरी किरकोळ किंमत १२६ रूपये प्रतिकिलो होती, जी वर्षभरात १३.५ टक्क्यांनी वाढली आहे.

एकूण डाळींची आयात वाढलीमागच्या सहा वर्षांच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षांमध्ये भारताने सर्वांत जास्त डाळींची आयात केली असून ती वार्षिक तुलनेच्या ८४ टक्क्यांनी जास्त होती.आर्थिक वर्ष २०२३ मध्ये भारताने २५ लाख टन डाळींची आयात केली होती पण मागच्या वर्षी भारताने तब्बल ४६ लाख टन डाळींची आयात केली आहे. 

तूर आणि उडीदाची आवकही वाढलीमागच्या आर्थिक वर्षात एप्रिल आणि मे या दोन महिन्यात १ लाख २२ हजार ३०७ टन तुरीची आवक झाली होती. तर यावर्षी याच दोन महिन्यामध्ये १ लाख २३ हजार ७५० टन तुरीची आवक करण्यात आली आहे.  त्यातुलनेत उडीदाचे दुप्पटीपेक्षा जास्त आवक करण्यात आली असून मागच्या वर्षी ५७ हजार ८६५ टन आवक झाली असताना यंदा मात्र १ लाख ३३ हजार १२० टन उडीदाची आयात दोन महिन्यात करण्यात आली आहे. 

केंद्र सरकार ग्राहकांच्या हितापोटी आणि देशांतर्गत अन्नाचा तुटवडा निर्माण होऊ नये या उद्देशाने अन्नधान्यांची आयात करत आहे पण देशांतर्गत उत्पादन वाढीसाठी काय प्रयत्न केले जात आहे का असा प्रश्न आता निर्माण होत आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी