Join us

पूर्णा नदीवर बांधणार ११ ठिकाणी साखळी बंधारे, जवळपास ४२ किलोमीटर पाणी अडविले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 09:33 IST

सिल्लोड तालुका होणार सुजलाम् सुफलाम् : शासनाची तत्त्वतः मान्यता

सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीवर एकूण ११ ठिकाणी साखळी बंधारे उभारण्यास शासनाने शुक्रवारी तत्त्वतः मंजुरी दिली आहे. यामुळे तालुका आता सुजलाम् सुफलाम् होण्यास मदत होणार आहे.शेतकरी वर्गातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. शासनाने भराडी ल.पा. तलाव या प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता रह करून त्याऐवजी ११ साखळी बंधाऱ्यांच्या फेरनियोजनाच्या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता दिली आहे.

भूजल पातळीत होणार वाढया निर्णयानुसार पूर्णा नदीच्या पात्रात जवळपास ४२ किलोमीटर पाणी अडविले जाणार आहे. येथे उभारण्यात येणाऱ्या साखळी बंधाऱ्यांमुळे सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होणार असून पीक उत्पादनासाठी शाश्वत सिंचनाची साधने उपलब्ध होतील. या बंधाऱ्यांमुळे दुष्काळावर मात करण्यासाठी जलस्रोतांचे मोठे बळकटीकरण होण्यास तसेच परिसरात भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होईल. छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या विभागीय बैठकीत अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार यांनी ही मागणी लावून धरली होती. त्याचेच एक फलित म्हणून सिल्लोडच्या पूर्णा नदीवर ११ ठिकाणी साखळी बंधारे उभारण्याच्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली आहे.

शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडेल

सिल्लोड हा आत्महत्याग्रस्त तालुका आहे. शेतकयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी येथील शेतकरी दोन पिके घेणारा निर्माण व्हावा, यासाठी सिंचनव्यवस्थेच्या बळकटीकरणाच्या अनुषंगाने पूर्णा नदीवर बॅरेजेस उभारण्यात यावे, यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात निश्चितपणे आमूलाग्र बदल घडून येईल. - अब्दुल सत्तार, पणन व अल्पसंख्याकमंत्री

टॅग्स :पाटबंधारे प्रकल्पदुष्काळपाणीपूर्णा नदी