Join us

Chaitram Pawar : वनक्षेत्राच्या वाढीसाठी केलेल्या कामाचा गौरव; बारीपाड्याच्या चैत्राम पवारांना पद्मश्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 08:58 IST

padma shri chaitram pawar चैत्राम पवार यांनी वनक्षेत्राच्या वाढीसाठी केलेलं काम गौरवास्पदंच आहे. छोट्यामोठ्या तळ्यांच्या उभारणीतून भूजल पातळी वाढवणे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्मपुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर), गायक पंकज उधास (मरणोत्तर), निर्देशक-अभिनेते शेखर कपूर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

अभिनेते अशोक सराफ, गायिका आश्विनी भिडे देशपांडे, निसर्गअभ्यासक मारुती चितमपल्ली, वनसंवर्धक चैत्राम पवार, होमिओपॅथी डॉ. विलास डांगरे, गायिका जसपिंदर नरुला, बासरीवादक रणेंद्र (रोणु) मजुमदार, चित्रकार वासुदेव कामत, सुलेखनकार अच्चुत पालव, बँकर अरुंधती भट्टाचार्य तसेच कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल सुभाष खेतुलाल शर्मा यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, पद्मभूषण पुरस्कारांसाठी  माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर), गायक पंकज उधास (मरणोत्तर), निर्देशक-अभिनेते शेखर कपूर यांची झालेली निवड म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा, कलासमृद्धीचा गौरव आहे.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरव झाल्यानंतर, त्यांना आता पद्मश्री जाहीर झाला आहे. त्यांना तसेच आश्विनी भिडे देशपांडे, रणेंद्र मजुमदार, वासुदेव कामत, अच्चुत पालव यांनी महाराष्ट्राचं, देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं, त्यांना जाहीर झालेला पुरस्कार महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचा गौरव आहे. हा गौरव भावी पिढीच्या मनात कलाक्षेत्राबद्दल प्रेम, आस्था निर्माण करेल, असा विश्वास आहे.

वनं, पर्यावरण आणि निसर्गाशी घट्ट नाळ जुळलेल्या अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा राज्यातल्या प्रत्येक निसर्गप्रेमीचा गौरव आहे. जंगल वाचणारा माणूस ही ओळख असलेल्या मारुती चितमपल्ली यांनी इतरांनाही जंगल वाचायला शिकवलं. त्याबाबतची गोडी निर्माण केली. त्यातून वनांच्या संरक्षणाबाबतची जागृती वाढली, हे त्यांचं मोठं यश आहे, असं मी मानतो.

चैत्राम पवार यांनी वनक्षेत्राच्या वाढीसाठी केलेलं काम गौरवास्पदंच आहे. छोट्यामोठ्या तळ्यांच्या उभारणीतून भूजल पातळी वाढवणे. वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी करणे. जंगल, पशु, पक्षी यांच्या संरक्षण, संवर्धनाची सक्रीय चळवळ उभारण्याच्या त्यांच्या कार्याचा, पद्मश्री पुरस्काराने झालेला गौरव निसर्गाबद्दल आवड असलेल्या युवापिढीला प्रेरणा देणारा आहे.

होमिओपॅथी डॉक्टर विलास डांगरे यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार हा, अर्ध्या शतकाहून अधिक काळ विदर्भातील गरीबांची वैद्यकीय सेवा करणाऱ्या समर्पित वृत्तीचा गौरव आहे. विदर्भातील वैद्यकीय सेवेतील भीष्मपितामह असा गौरव असलेल्या डॉ. विलास डांगरे यांनी ध्येयनिष्ठेने, समर्पित वृत्तीने पन्नास वर्षांहून अधिक गरीब रुग्णांची सेवा केली. याकाळात डॉक्टरांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या. त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा समर्पित सेवाकार्याचा गौरव आहे.

पद्म पुरस्काराची यादी पाहण्यासाठी क्लिक करा.

टॅग्स :पद्मश्री पुरस्कारजंगलकेंद्र सरकारसरकारपर्यावरणपाणीप्रजासत्ताक दिन २०२४