Join us

दूध दरवाढीसाठी कोपरगाव - संगमनेर रस्त्यावर चक्का जाम; दुधाला ४० रुपये दर देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 13:28 IST

Maharashtra Milk Rate दुधाला किमान ४० रुपये प्रति लिटर दर देण्यात यांसह विविध मागण्यांसाठी कोपरगाव- संगमनेर रस्त्यावर जवळके (ता. कोपरगाव) येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.०१) चक्का जाम आंदोलन केले.

दुधाला किमान ४० रुपये प्रति लिटर दर देण्यात यावा, यासह स्वतंत्र न्यायाधिकरणाची स्थापना करून किमान आधारभूत किंमत ठरवून त्याबाबतचा कायदा करावा, अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करून जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद करावी, या मागण्यांसाठी कोपरगाव- संगमनेर रस्त्यावर जवळके (ता. कोपरगाव) येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.०१) चक्का जाम आंदोलन केले.

पाऊण तास चाललेल्या या आंदोलनामुळे कोपरगाव-संगमनेर मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शिर्डीचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

यावेळी बोलताना अ‍ॅड. योगेश खालकर म्हणाले की, चाऱ्याचे व पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या दुधाला मिळत असलेला दर शेतकऱ्यांना परवडत नाही. १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून ५ जानेवारी २०२४ पासूनचे शासनाकडे प्रलंबित असलेले प्रति लिटर ५ रुपये अनुदान दूध उत्पादकांनी उत्पादित केलेल्या सर्व दुधाला विनानिकष सरसकट मिळावे.

तसेच खते, कीटकनाशके व शेती उपयोगी साहित्यावरील जीएसटी पूर्णपणे माफ करण्यात यावा. दुधाला कमीत कमी ४० रुपये दर मिळावा, अशी मागणी केली.

अ‍ॅड. रमेश गव्हाणे म्हणाले की, शासन दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. दुधापासून बनणाऱ्या वस्तूंना भाव आहे, पण दुधाला भाव नाही, हे दुर्दैव आहे. शासनाने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडे सकारात्मकतेने पाहावे.

यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून निषेध व्यक्त केला. हा रास्ता रोको पाऊण तास चालला. यावेळी लक्ष्मण थोरात, रंगनाथ गव्हाणे, परभत गव्हाणे, विजय गोर्डे, रामनाथ पाडेकर, सुनील थोरात, रामनाथ गव्हाणे, कैलास गव्हाणे, शैलेश खालकर, रवींद्र कुरकुटे, श्रीहरी थोरात, सुनील घारे, अशोक नेहे, रवींद्र पाडेकर, भास्कर पाचोरे, बजरंग गव्हाणे आदी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तीव्र आंदोलनाचा इशारा

दूध दरवाढीसंदर्भातील हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. शासनाने लवकर यावर निर्णय न घेतल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही अ‍ॅड. योगेश खालकर यांनी यावेळी दिला.

हेही वाचा - बाजारात 'ईअर टॅगिंग' नसलेल्या जनावरांची खरेदी-विक्री बंद

टॅग्स :दूधकोपरगावसंगमनेरगायशेतकरीशेतीशेती क्षेत्रमहाराष्ट्र सरकार