कोल्हापूर : एकाच वर्षात दोन वेळा पीक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात १२ हजार २८८ शेतकऱ्यांची नावे सहकार विभागाने पाठविली होती, त्यातील निकषाची चाळण लावून किमान १० हजार शेतकऱ्यांना ४० कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
येत्या आठवड्यात अंतिम याद्या सहकार विभागाकडे येणार असून, त्यानंतर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.
कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी असल्याने येथे आर्थिक वर्षानुसार पीक कर्जाची परतफेड केली होत नाही. त्यामुळे एकाच वर्षांत दोन वेळा कर्जाची उचल दिसत असल्याने त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहावे लागले होते.
राज्य सरकारने अशा शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार याद्या तयार करून १२ हजार २८८ खातेदारांसाठी ४६ कोटी ७३ लाख रुपयांचे अनुदानाचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सहकार विभागाकडे पाठविला होता.
यातून नोकरदार, आयकर परतावा करणारे, यासह इतर काही निकषांची चाळण लावल्यानंतर किमान १० हजाराहून अधिक शेतकऱ्यांना ४० कोटी रुपये मिळू शकतात, अशी अपेक्षा आहे.
एका वर्षात दोन वर्षे कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी पाठविली आहे. येत्या आठवड्यात मंजुरीची अंतिम यादी प्राप्त होईल, त्यासाठी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. - नीलकंठ करे, जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर