Join us

बाजरी उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2023 13:18 IST

बाजरीचे पीक फुलोऱ्यात येऊन दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने जिरायती भागात बाजरीला पाण्याची गरज निर्माण झाली असून, परिणामी उत्पादनात घट येणार असल्याची परिस्थिती उद्भवली आहे.

सद्य:स्थितीत सर्वत्रच पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आला असल्याची परिस्थिती आहे. दौंड तालुक्यात बाजरी पिकाची लागवड सरासरी एवढी झाली असून, बाजरीचे पीक फुलोऱ्यात येऊन दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने जिरायती भागात बाजरीला पाण्याची गरज निर्माण झाली असून, परिणामी उत्पादनात घट येणार असल्याची परिस्थिती उद्भवली आहे.

दौंड तालुक्यामध्ये खरीप हंगामाचे बाजरीचे सरासरी क्षेत्र ३०७७ हेक्टर असून त्यापैकी आजरोजी २९७७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बाजरीचे पीक हे तीन महिन्यांच्या कालावधीत नगदी पीक म्हणून ओळखले जाते. बाजरीच्या पिकासाठी जास्त पावसाची आवश्यकता नाही; परंतु वेळोवेळी पाऊस बरसणे गरजेचे आहे. तालुक्यातील भीमा आणि मुळा-मुठा नदीचा परिसर सोडला तर काही भागात बाजरीला तग धरण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे.

पेरणीयुक्त समाधानकारक पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलाव्याच्या आधारे शेतकऱ्यांनी बाजरीची पेरणी केली आहे. परंतु, सद्य:स्थितीत बाजरी फुलोऱ्यात येत असल्याने कणसांमध्ये दाणे भरण्यासाठी पावसाची नितांत गरज निर्माण झाली आहे.

आम्ही दरवर्षी बाजरीचे पीक घेत असून, यावर्षी दोन एकर क्षेत्रावर बाजरीची पेरणी केली आहे. नदीचे पाणी उपलब्ध असल्याने पावसाची उणीव जाणवली नाही. परंतु, अत्यल्प स्वरुपात पाऊस झाल्यामुळे दरवर्षीप्रमाणे बाजरीच्या पिकाला ते कमी दिसून येत आहे. - राहुल जगताप शेतकरी (राहू)

दरवर्षीप्रमाणे चालू वर्षात सरासरी एवढी बाजरी पिकाची पेरणी झाल्याची नोंद असून, पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सध्यातरी जिरायती भागात बाजरीच्या पिकाला पावसाची नितांत गरज निर्माण झाली आहे. - राहुल माने, दौंड तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :शेतीपीकशेतकरीखरीपपेरणीपाऊसदौंड